Friday, 16 May 2025

‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ - ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला.. बॅालिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी पहिल्यांदाच मराठीत

 


‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ - 

‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला..

बॅालिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी पहिल्यांदाच मराठीत 

‘जारण’च्या थरारक पोस्टर्सने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाचे पोस्टर्स पाहून सगळ्यांच्याच मनात या रहस्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. या उत्सुकतेत भर पाडत ‘जारण’चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले विचित्र भय, तिच्या घरात घडणाऱ्या असामान्य घटना आणि त्यामागचे धक्कादायक गूढ या सगळ्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ या वाक्यातून कळते, की तिच्या भोवती घडणाऱ्या असामान्य गोष्टी केवळ वर्तमानाच्या नसून त्या भूतकाळाशी जोडलेल्या आहेत. टीझरमधील अनिता दातेची लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू व डोळ्यात अनोखी ऊर्जा असलेला भयावह अवतार पाहायला मिळत असून ती जारणाची क्रिया करताना दिसत आहे. यावरून असेही कळतेय, की तिच्या या पात्रात काहीतरी भयानक रहस्य दडलेले आहे. 


अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. 


दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल, असा हा चित्रपट असून प्रेक्षकांना ‘जारण’ नक्कीच आवडेल, अशी मी आशा करतो.”


निर्माते अमोल भगत म्हणतात, “ चित्रपटाच्या पोस्टर्सना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून खूप आनंद होतो. आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पोस्टर्सप्रमाणे टीझरही प्रेक्षकांचे लक्ष वेधले असेल, याची मला खात्री आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या असून चित्रपटात कुटुंबातील बारीकसारीक भावभावना, मानसिक तणाव, आणि अंधश्रद्धांमुळे नात्यात येणारा दुरावा हे सगळे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.”


Saturday, 3 May 2025

पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 'पी.एस.आय.अर्जुन'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित



 पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 

'पी.एस.आय.अर्जुन'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित 

Or 

महाराष्ट्रात राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन’ - अंकुश चौधरी प्रथमच दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

Or 

 ⁠ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’



बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'पी.एस. आय. अर्जुन' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, हे नक्की !

ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ‘’मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. पीएसआय अर्जुन एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स असे सगळेच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला. इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले, यातच सर्व काही आले. ट्रेलरवरून प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असलेच. आम्ही प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. आता ९ मेपासून आम्ही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहोत. मला खात्री आहे, प्रेक्षक ‘पी. एस. आय. अर्जुन’वर भरभरून प्रेम करतील.’’

निर्माते विक्रम शंकर म्हणतात, ‘’चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग वेगळया पद्धतीने करण्याचे मनात होते. चित्रपट पोलिसांवर आधारित असल्याने जेलमध्ये ट्रेलर लाँच सोहळा करावा असे ठरले. खूप वेगळा असा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटातील डायलॅाग्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणेही धुमाकूळ घालत आहे. रसिकांकडून मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला उत्साह देणारा आहे. मुळात ही चित्रपटाची टीम कमाल आहे. बॅालिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक, मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, नकाश अजीज यांच्यासारखा गायक अशी उत्तम भट्टी जमून आली आहे.’’


या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.