सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या किंग जे. डी. म्हणजेच श्रेयश जाधवला आर. पी. समर्थ स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणार्या 'विदर्भ रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार आर. पी. समर्थ यांच्या ५० व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ३० जानेवारी रोजी नागपूर येथे महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजीत वंजारी आणि दळवी मेमोरिअल हॉस्पिटलचे अध्यक्ष बलबीरसिंग रेणू यांच्या उपस्थितीत झाले.
मराठी सिनेसृष्टीत रॅपचा पायंडा घालून देणाऱ्या श्रेयशने 'ऑनलाईन- बिनलाईन', 'बसस्टॉप', 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटांची निर्मिती केली तर 'मी पण सचिन' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. श्रेयशने चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण, आशयपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. आज अनेकदा मराठी सिनेसृष्टीत रॅप, हिप हॉप साँग्सचा प्रयोग केला जातो. मात्र मराठी इंडस्ट्रीला या वेस्टर्न म्युजिकची खरी ओळख श्रेयशने करून दिली आहे. रॅप सॉंगमधूनही श्रेयशने सामाजिक विषय अतिशय उत्तमरित्या हाताळले. म्हणूनच प्रेक्षकांनी कायमच त्याच्या कलाकृतीला पसंती दिली. प्रेक्षकांची नाळ ओळखून त्यांना दर्जेदार चित्रपट देणारा श्रेयश आता 'मनाचे श्लोक', 'फकाट', बघतोस काय मुजरा कर २', 'मीटर डाऊन' असा मनोरंजनाचा जबरदस्त खजिना घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विदर्भात जन्मलेल्या श्रेयशचा सिनेसृष्टीतील हा यशस्वी प्रवास निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. इतक्या कमी वयात त्याने सिनेसृष्टीत भरपूर नाव कमावले. त्याच्या याच कारकिर्दीची दखल घेत त्याला 'विदर्भ रत्न' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment