Friday, 5 February 2021

आरोग्यदूत सरपंच ठरला हिरोलाही भारी - नवनाथ काकडेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच अवधूत आणि आदर्श एकत्र -



मागच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. मात्र २०२१ हे नवीन वर्ष आपल्या देशासाठी आनंद घेऊन आले आणि कोरोना आटोक्यात आला. या महामारीच्या अति कठीण काळात अनेक लोकांनी स्वइच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान कार्य केले. त्यांच्या याच कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने तयार केले आहे. 'हिरो सरपंच' नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉन्ग असून 'आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी' असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचे प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे. या कठीण काळात हाच आरोग्यदूत असणारा सरपंच हिरो ठरला आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला.

       यावेळी श्री प्रवीण दरेकर म्हणाले, " सरपंच या पदामुळेच गावाचा विकास होतो. आणि भारत हा खेड्यांचा, गावांचा देश आहे. त्यामुळे सरपंच गावाचा विकास करताना देशाचा सुद्धा विकास होत असतो. त्याचा या देशाला पुढे नेण्यात खूप मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही.त्यांच्या या विकासपर्वाला आणि कोरोनाकाळातल्या कार्याला या गीताच्या माध्यमाने एक मानवंदना देण्याचा जो प्रयत्न झाला आहे, तो खरंच खूपच उल्लेखनीय आहे. या गीतामुळे शहरी नागरिकांनादेखील सरपंच आणि त्यांच्या कार्याचे महत्व लक्षात येणार आहे."

     या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व आजी माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या या महान कार्याला एक सलाम असून यातून सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देण्याचाही हा एक प्रयत्न आहे.

     या गाण्याला संगीत देणारा आणि स्वरबद्ध करणारा अवधूत या गाण्याबद्दल सांगतो, " हे गाणं माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. ह्या गाण्याला संगीत आणि आवाज देणे हे मी माझे भाग्यच समजतो. माझा थेट संबंध गावाशी, गावाच्या मातीशी असल्यामुळे मी समजू शकतो की, सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका एका गावासाठी किती महत्वपूर्ण आहे. हीच भूमिका या गाण्यातून अतिशय समर्पक शब्दात नवनाथ काकडे यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली आहे. सरपंच हा त्या गावासाठी किती महत्वाचा असतो हे मी अनुभवले आहे, गावाचा विकास हाच त्याचा ध्यास असतो. सामान्य माणसाला सरपंच आणि त्याचे कार्य सोप्या शब्दात सांगणारे हे गाणं आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना कृतज्ञता पूर्ण एक भेट आहे."

     तर गायक आदर्श शिंदे सांगतात, " हे गाणं तर नक्कीच स्पेशल आहे, मात्र ह्या गाण्याच्या निमित्ताने अजून एक स्पेशल गोष्ट घडली आहे, ती म्हणजे मी आणि अवधूत गुप्ते पहिल्यांदाच सोबत एक डुएट गाणे गात आहोत. मी नवनाथ काकडे यांचे मनः पूर्वक धन्यवाद करतो की, इतके सुंदर गाणे त्यानी मला गाण्यासाठी दिले, हे गाणे ऐकल्यावर नक्कीच सर्वांच्या मनात सकारत्मकता आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. त्या गावाचा प्रथम व्यक्ती असणारा हा सरपंच गावासाठी देवदूत  असतो. याच सरपंचाच्या प्रयत्नाने गाव विकासाच्या दिशेने प्रवास सुरु करते. त्यांच्या या प्रवासाला आमच्याकडून या गाण्यातून एक धन्यवाद म्हणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे." 

    हे गाणे ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले ते गीतकार श्री.नवनाथ काकडे यांनी सांगितले, " सिनेसृष्टीने बऱ्याचदा सरपंचावर अन्याय केला आहे. त्याची प्रतिमा अनेक चित्रपटांमधून चुकीची दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रतिमा दुरुस्त होवुन सरपंचांची गरिमा आणि प्रतिष्ठा लोकांसमोर आणण्याचा हे गाणे म्हणजे एक भाग आहे. गाणे लिहीत असतानाच मीच अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे ही दोन नावं मनात तयार ठेवली होती. त्यांनी देखील यासाठी लगेच होकार दिला आणि माझे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला मदत केली. कोरोनाकाळात आरोग्यदूत असणाऱ्या या सर्व आजी, माजी सरपंचाना,उपसरपंचाना हे वेस्टर्न सॉन्ग प्रथमच आम्ही समर्पित करीत आहोत."

    गाण्याचे लेखन आणि निर्मिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी केले आहे, तर संगीत संयोजक म्हणून प्रदीप कार्लेकर यांनी काम पाहिले आहे. या गाण्याचे ध्वनी मुद्रण मुंबईतील अजितवसान स्टुडिओमध्ये पार पडले. तर रिदम आदेश मोरे, सचिन भांगरे यांचे असून, संगीत सहायक नितीन ढोले, ध्वनी अभियंता अवधूत वाडकर यांनी केले आहे. ध्वनी मिश्रण हे डॉनल व्हेलन लंडन येथील असून छायाचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे.



Song Link: https://www.youtube.com/watch?v=5RIZRavS_6E


Interview Link: https://wetransfer.com/downloads/5429e596b8f4991fb1e173fe378f3eeb20210204162520/1206912008f648f6a15d23f72821c29320210204162550/f565a6

No comments:

Post a Comment