मुंबई, 31 मार्च 2021: अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा ट्रेलर सादर केला. हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी गुढीपाडव्याची भेट असणार आहे. भारतातील प्राइम सदस्यांना पाडव्याच्या काही दिवस आधी म्हणजेच 9 एप्रिल 2021 रोजी या व्यासपीठावर हा सिनेमा एक्स्लुसिव्ह स्ट्रीम होणार आहे. प्रियंका तनवर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली ड्रामामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यासारखे लोकप्रिय मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आदित्य आणि मीरा (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते. आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे.
वेल डन बेबी प्रदर्शित होत असल्याची नुकतीच झालेली घोषणा आणि त्यापाठोपाठ आलेला ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसने सादर केला आहे. भारतातील प्राइम सदस्यांना 9 एप्रिल 2021 पासून हा सिनेमा स्ट्रीम करता येईल.
ट्रेलरची लिंक :
No comments:
Post a Comment