प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच 'जॉबलेस'च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. 'जॉबलेस' नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत प्रमुख भुमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, अशी या सिरीजची कथा आहे. सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'जॉबलेस'ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो, त्यातून तो जितकं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या दलदलीत अडकत जातो, ही कथा काही अंडरवर्ल्डची नाही, परंतु, ज्या पद्धतीची गुन्हेगारी या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे ती मराठी प्रेक्षकांनी या आधी क्वचितच कुठल्या सिनेमात किंवा वेबसिरीजमध्ये अनुभवली असेल.
या वेबसिरीजविषयी प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''जॉबलेसचा विषय हा क्राईम थ्रिलर जॉनरचा आहे, एक चुकीचा निर्णय कसा आयुष्याची राखरांगोळी करू शकतो आणि तो मोहाचा क्षण कसा भुरळ घालू शकतो, अशी काहीशी या वेबसिरीजची कथा आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांना एका जबरदस्त क्राईम थ्रिलरचा नक्कीच अनुभव देईल, या कथेविषयी फारसं सांगणं म्हणजे स्पॉयलर ठरेल, मात्र ही सीरीज प्रेक्षकांना नक्कीच शेवटपर्यंत बांधून ठेवू शकेल, एवढं मी नक्कीच सांगू शकतो".
ही वेबसिरीज सात भागांची असून याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केलंय. तर, हरीश दुधाडे, अमित बैचे, पिनाक बडवे, श्रीपाद दीक्षित, क्षीतिज कुलकर्णी यांनी निर्मात्याची तर सिद्धार्थ राजाराम घाडगे यांनी असोसिएट प्रोड्युसरची धुरा सांभाळली आहे. सुनील खरे हे डीओपी असतील. ही वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment