Wednesday, 21 July 2021

'रावसाहेब'च्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी' आणि निखिल महाजन पुन्हा एकत्र



'रावसाहेब'च्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी' आणि निखिल महाजन पुन्हा एकत्र

 

       मराठीतील पहिल्यावहिल्या ओटीटीचा मान पटकावणारे 'प्लॅनेट मराठी' दिलेल्या वचनानुसार प्रेक्षकांसाठी नवनवीन वेबसिरीज, वेबफिल्म, चित्रपट भेटीला घेऊन येत आहे. त्यातच आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. लेखक, दिग्दर्शक निर्माता निखिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'रावसाहेब' या आगामी चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर व प्लॅनेट मराठी एस. एस. प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'रावसाहेब' या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, आणि निखिल महाजन यांनी केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता हा चित्रपट वन्यजीवनावर आधारित असल्याचे दिसतेय. या चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन यांनी केली आहे. 

        या चित्रपटाविषयी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''निखिल सोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने मला अत्यंत आनंद होतोय. आमची मैत्री फार जुनी असून मी निखिलचे काम खूप जवळून पाहिले आहे. निखिल एक उत्तम दिग्दर्शक आहे. वेगवेगळे, संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या हाताळण्याची कला त्याला अवगत आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'रावसाहेब' या चित्रपटाचे टिझर पोस्टर आम्ही प्रदर्शित करत आहोत.'' तर चित्रपटाविषयी लेखक, दिग्दर्शक, निर्माता निखिल महाजन म्हणतात,''आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'रावसाहेब' चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, यापेक्षा मोठी भेटवस्तू असूच शकत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय, हेच खूप मोलाचे आहे आणि  या चित्रपटाविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. मात्र हा विषयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!'' 

No comments:

Post a Comment