Thursday, 2 September 2021

'देवा गणराया' म्हणत रुपाली -चिन्मयने केली संसाराची सुरुवात



 'देवा गणराया' म्हणत रुपाली -चिन्मयने केली संसाराची सुरुवात 

      अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. या आनंददायी वातावरण अधिकच भर टाकणारे 'देवा गणराया' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पोस्टर झळकले होते आणि त्याला भक्तांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक न वाढवता हे गाणे अखेर भेटीला आले. चिन्मय उदगीरकर आणि रुपाली भोसले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजाने चारचाँद लावले आहेत. संदीप माळवी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती केदार जोशी यांची असून दिग्दर्शन आशिष नेवाळकर यांचे आहे.




    हे गाणे आपल्या लाडक्या बाप्पावर आधारित असले तरी या गाण्याला एक कथा आहे. आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. त्याप्रमाणेच या गाण्यातील जोडपेही त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करताना दिसत आहेत. नुकतेच लग्न झालेली नववधू आधुनिक कपड्यांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येते आणि तेथील स्त्रिया तिला मराठमोळ्या रूपात घेऊन येतात. हा पारंपरिक साज, तिचे लाजणे या सर्वच गोष्टी खूप मोहक आहेत. त्यानंतर हे जोडपे गणरायाची आराधना करतात. ही छोटीशी कथा या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने मांडण्यात आली आहे. गणपतीच्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणे जरा वेगळे आहे. गाणे जरी वेगळ्या पद्धतीने सादर केले असले, तरीही बाप्पाविषयी असलेल्या प्रेमाची भावना तितकीच मनापासून आहे. अतिशय गोड आणि आनंद निर्माण करणारे हे गाणे भक्तांना बाप्पाच्या भक्तीत तल्लीन करणारे आहे.

No comments:

Post a Comment