Wednesday, 29 December 2021

अंकुश, वैदेही, सिद्धार्थचा 'लोच्या झाला रे' प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा हा चित्रपट ११ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित



 अंकुश, वैदेही, सिद्धार्थचा 'लोच्या झाला रे'

प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा हा चित्रपट ११ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित 


नवीन वर्षाची सुरुवात यंदा एकदम दणक्यात होणार आहे. कारणच तसे आहे. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून पोस्टर पाहून हा एक तुफान विनोदी चित्रपट असेल असे दिसतेय. आता कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मुळात हे चारही कलाकार एकत्र पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.  त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार हे मात्र नक्की!


'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन परितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे. परितोष पेंटर यांनी यापूर्वी धमाल, टोचल धमाल अशा बॅालिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे.  ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण संजय मेमाणे यांचे असून ज्यांनी आधी झिम्मा, हिरकणी, हाफ तिकीट सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा , नितीन केणी , परितोष पेंटर व शांताराम मनवे यांनी केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत. लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट 'मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन' अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हिझने पाहिले आहे. यात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 


 मुंबई मुव्ही स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा म्हणतात “ मुंबई मुव्ही स्टुडिओज हा भारतातील पहिला प्रादेशिक चित्रपट स्टुडिओ आहे, जो प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीवर आणि वितरणावर लक्ष केंद्रित करणार आहे. या सगळ्या चित्रपटांसाठी लागणारा थिएटर आराखडा तयार असून आम्हाला आनंद होत आहे, की 'लोच्या झाला रे' या आमच्या पहिल्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही ही घोषणा करत आहोत. महामारीचा चित्रपट व्यवसायावर निश्चितच परिणाम झाला आहे. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर प्रादेशिक चित्रपटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, प्रेक्षक थिएटरमध्ये उत्कृष्ट दर्जा असलेल्या मनोरंजनाच्या शोधात आहे. ‘लोच्या झाला रे' सारखा विनोदी चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत जो प्रेक्षकांना खळखळून हसवेल. प्रेक्षकांची २०२२ची सुरुवात एका जबरदस्त मनोरंजनाने होणार आहे. 


   'लोच्या झाला रे'चे दिग्दर्शक परितोष पेंटर म्हणतात, '' या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. अंकुश, सिद्धार्थ, वैदेही, सयाजी शिंदे आणि सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा आली. एक तर मुळात हे सगळे नामांकित कलाकार असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे खूपच सहज झाले. जे तुम्हाला पडद्यावर दिसेलच.''


 'मुंबई मुव्ही स्टुडिओज' लवकरच  दोन मराठी चित्रपटांची घोषणा करणार असून  ‘लोच्या झाला रे’ चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ पासून प्रेक्षकांना जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.  या निमित्ताने मनोरंजनाची उत्तम मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे

No comments:

Post a Comment