Sunday, 9 January 2022

शिक्षणातून माणसं घडवणारी ‘बदली’

 

Badlee [Trailer] 'बदली' | Planet Marathi Originals | Akshay Bardapurkar | Planet Marathi OTT - YouTube

शिक्षणातून माणसं घडवणारी ‘बदली’

- प्लॅनेट मराठी'वरील ‘बदली’चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला -

एखाद्या शहरातील शिक्षकाची बदली जेव्हा   पहिल्यांदा एका ग्रामीण भागात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यापर्यंतचे काम या शिक्षकांना करावे लागते. ग्रामीण भागातील अशाच काहीशा शैक्षणिक परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारी ‘बदली’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. 


'बदली' या वेब सिरीजचे लेखन,  दिग्दर्शन , कथा  पटकथा आणि संवाद  नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के यांनी  'बदली'ची निर्मिती केली आहे.  छायांकन वीरधवल पाटील तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे . प्लॅनेट मराठी  व अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत 'बदली' ही आठ भागांची  अनोखी वेब सिरीज १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजचे चित्रीकरण साताऱ्यातील एका शाळेत केले आहे. 


'बदली'बाबत दिग्दर्शक नितीन पवार म्हणतात, ‘’या वेब सिरीजमधून आम्ही ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातील शाळांची दृश्ये ही साताऱ्यातील एका शाळेत चित्रित केली असून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यथा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गावाकडील तरुणांचा शहराकडे जाण्याचा कल वाढला असून ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. आज इंग्रजी शाळांकडे अनेक जण वळत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण मराठी शाळांना विसरून चालणार नाही . 'बदली'च्या निमित्ताने ग्रामीण  मराठी शाळांना सुगीचे दिवस येणार असतील  तर आम्हाला खूप आनंद होईल. 'बदली'चे चित्रीकरण झाल्यावर आम्ही त्या शाळेला पुन्हा विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शैक्षणिक सामग्री पुरवण्याचा प्रयत्न केला . शिक्षक हे येतील, जातील पण पहिली आपली मुलं शिकली पाहिजेत,त्यासाठी आधी आपण आपली शाळा टिकवली पाहिजे... यात आमचा मूळ हेतू हाच आहे की ओस पडत असणाऱ्या मराठी ग्रामीण शाळांचे पुन्हा चांगले दिवस यावेत आणि यासाठी प्लॅनेट मराठीने आम्हाला सहकार्य केले आहे.’’ तर या  वेब सिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ' बदली ' ही एक सत्य परिस्थितीवर आधारलेली वेब सिरीज असून आमचा प्रयत्न आहे की फक्त ग्रामीणच नाही तर शहरातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत ही वेब सिरीज पोहोचावी. या निमित्ताने गावोगावी भविष्यातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होईल. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment