Thursday 21 April 2022

*चंद्रा- दौलतरावांच्या प्रेमकहाणीत 'सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने'ची एंट्री * ‘चंद्रमुखी’ च्या निमित्ताने प्रसाद ओक - चिन्मय मांडलेकरची हॅट्रिक



 *चंद्रा- दौलतरावांच्या प्रेमकहाणीत 'सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने'ची एंट्री *

 ‘चंद्रमुखी’ च्या निमित्ताने प्रसाद ओक - चिन्मय मांडलेकरची हॅट्रिक

          आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती 'चंद्रा' हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावले. तिची आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा जाणून घेण्याविषयी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रा आणि दौलतराव यांच्या हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट येणार का, की त्यांची प्रेमकहाणी अशीच अबाधित राहणार, याचे उत्तर आपल्याला २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे. 

              एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच 'चंद्रा'च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहेत. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 

              चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ''ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करण्यात आली आहे आणि त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणण्यामागेही काही विचार होता. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे. मात्र अमृता, मृण्मयी आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे.'' 

            तर मृण्मयी देशपांडे आपल्या भूमिकेबद्दल बोलते, ''यात मी खासदार दौलतराव देशमाने यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. डॉली म्हणजेच दमयंती दौलतराव देशमाने. जिचा दौलतरावांची कारकीर्द घडवण्यात मोठा सहभाग आहे. ट्रेलरपर्यंत आम्हाला ही व्यक्तिरेखा समोर येऊ द्यायची नव्हती याचे कारण म्हणजे कथानकात पुढे काय गोष्ट बदलते, यावर पडदा ठेवायचा होता. एक एक व्यक्तिरेखा समोर येत होत्या तशा त्या प्रेक्षकांच्या डोक्यात बसत होत्या आणि अचानक माझी व्यक्तिरेखा समोर आल्यावर सगळी समीकरणे बदलली. मात्र चित्रपटात उलट आहे. 'चंद्रमुखी'च्या येण्याने सगळी समीकरणे बदलतात. प्रमोशन आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.  मला एक आवर्जून सांगावेसे वाटते, याची पटकथा चिन्मयने लिहिली आहे आणि आतापर्यंतची चिन्मयची ही सर्वोत्तम कलाकृती आहे. ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची खुबी प्रसादकडे आहे. त्यानेही उत्तमरित्या ही कथा समोर आणली आहे.''  

           तर 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हा एक भव्य चित्रपट आहे. चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, कथानक, संगीतकार, गीतकार, गायक, छायाचित्रणकार अशा सगळ्याच उजव्या बाजू आहेत. त्यामुळे हा चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. मी फार नशीबवान आहे की, हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली. यापूर्वी अनेक जण विश्वास पाटील यांना चित्रपट बनवण्या संदर्भात भेटून आले होते, मात्र त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि माझ्या नशिबात हा चित्रपट होता. मुळात हा एक कठीण चित्रपट होता आणि जो आम्ही कठीण काळात केला आहे. प्रेक्षकांना मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो, अमृता आणि आदिनाथचा असा अभिनय तुम्हाला यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नसेल. दोघांनीही खूप मेहनत घेतली आहे, जी लवकरच पडद्यावर प्रेक्षकांना दिसेल. या चित्रपटाची भव्यता अनुभवायची असेल तर हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्येच जाऊन पाहावा.''

          मराठी सिनेसृष्टीला 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी 'चंद्रमुखी' सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटातील गाण्यांना गुरु ठाकूर यांचे बोल लाभले असून या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

No comments:

Post a Comment