जिओ स्टुडिओजच्या ‘मी वसंतराव’चे चित्रपटगृहात अर्धशतक
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी पन्नास दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटाने समिक्षकांकडून, प्रेक्षकांकडून आणि अनेक मान्यवरांकडून वाहवा मिळवली. सध्या अनेक बॅालिवूड, दाक्षिणात्य, मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या स्पर्धेत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाने पन्नासाव्या दिवशीही आपली जागा कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला आहे.
एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा यात दाखवण्यात आली असून प्रत्येकालाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही पुढील वीस वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले. राहुल देशपांडेंमध्ये त्यांना वसंतरावांचा भास झाला. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले तर आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून कळते, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद देशपांडे यांनी दिली. हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असून राहुलने वसंतराव अगदी हुबेहुब साकारल्याचे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. याव्यतिरिक्त शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, केदार शिंदे, सचिन खेडेकर, आदित्य सरपोतदार, रवी जाधव, रेणुका शहाणे, अश्विनी भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील बांदोडकर, वैदेही परशुरामी, गितांजली कुलकर्णी आदी नामवंतांनीही सकारात्मक प्रतिक्रया दिल्या आहेत.
अभिनेता राहुल देशपांडे म्हणतात, “ गुढीपाडव्याच्या शूभमुहुर्तावर ‘मी वसंतराव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत प्रेक्षकांनी या चित्रपटाला जे प्रेम दिले, त्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू शकलो. प्रेक्षकांच्या आजही चित्रपट पाहून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे हुरूप वाढतो. चित्रपटाची संपूर्ण टीम आणि माझे कुटूंब, नातेवाईक यांच्यामुळेच मी वसंतरावांची भूमिका योग्यरित्या साकारू शकलो. त्यामुळे हे सगळं यशाचं श्रेय आम्हा सर्वांचं आहे.’’
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment