Wednesday 18 May 2022

ओटीटी वरील देशातला सगळ्यात सशक्त कथानक असलेल्या ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित २० मे पासून फक्त प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला

 


ओटीटी वरील देशातला सगळ्यात सशक्त कथानक असलेल्या ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित 

२० मे पासून फक्त प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला



काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. या बोल्ड टिझरची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर आता ‘रानबाजार’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरनेही सर्वत्र खळबळ माजवली आहे. 



‘रानबाजार’च्या टिझरमधून तेजस्विनी पंडीत आणि  प्राजक्ता माळीचा थक्क करणारा मादक अंदाज प्रेक्षकांनी नुकताच अनुभवला आहे. ट्रेलरमधून यातील इतर चेहरेही आता समोर आले आहेत. यात उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता  खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पॅलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजीत पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली असून ही भव्य वेबसीरिज २० मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


   आजवर कधीही न पाहिलेले राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे ‘रानबाजार’ची उत्सुकता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. आजवरच्या वेबविश्वात कदाचित कधीही न पाहिलेली कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 





‘रानबाजार’चे दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, “टिझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी टिझरने लाखो व्ह्युजचा टप्पा पार केला असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिज प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ही वेबसीरिज पाहताना प्रेक्षकांच्या मनात असं काहीसं घडलं होतं,  कदाचित, असा विचार आल्याशिवाय राहणार नाही. राजकारणाभोवती फिरणारी ही कथा असली त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कल्पनेपलीकडच्या आहेत. हेच गूढ ‘रानबाजार’मध्ये उलगडणार आहे. 


प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापुरकर म्हणतात, “ अभिजित पानसे यांचा चित्रपट म्हणजे काहीतरी हटके असणार, हा एक नियमच आहे आणि आता तर त्यांनी वेबविश्वात पदार्पण केले आहे. त्यांच्या पहिल्याच ‘रानबाजार’ या वेबसीरिजने वेबविश्व हादरून टाकले आहे. असा विषय आजवरच्या वेबविश्वात कोणीही हाताळला नसेल. या वेबसीरिजची भव्यता आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. प्लॅनेट मराठीने आपला प्रेक्षक केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता, अवघ्या जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचेही प्लॅनेट मराठीचे ध्येय आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना तितक्या उच्च दर्जाचा आशय देण्यास आम्ही बांधिल आहोत. ‘रानबाजार’ ही त्याच दर्जाची वेबसीरिज आहे. राजकारणाभोवती फिरणाऱ्या या ‘रानबाजारा’तील गुपिते यानिमित्ताने समोर येणार आहेत.’’

1 comment: