'भिरकीट' माणुसकी जपण्याचा प्रयत्न - अनुप जगदाळे
या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?
- या चित्रपटात राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी, विनोद असे मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे. मुळात या चित्रपटात गावातील राजकारण दाखवण्यात आलं असलं तरी हा काही राजकीय चित्रपट नाही. ही एका गावातील गोष्ट आहे. गावामध्ये एक अशी घटना घडते, ज्याचा प्रभाव गावातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड, धमाल सुरु असते, ती म्हणजे 'भिरकीट'. आता ती नेमकी घटना कोणती, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, हा आमच्या घराण्याला लाभलेला वारसा आहे. माझ्या वडिलांनी आजपर्यंत टुरिंग टॉकीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक चित्रपट दाखवले. अगदी ब्लॅक अँड व्हाईटपासून कलरपर्यंतचे अनेक चित्रपट आम्ही प्रेक्षकांना दाखवले आहेत. चित्रपटसृष्टीतील प्रिंटपासून डिजिटलपर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. लहानपणापासून आम्ही सतत प्रेक्षकांमध्ये राहिलो आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडते, याचा विचार करूनच आम्ही चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो.
'भिरकीट'च्या चित्रीणीकरणादरम्यानचा अनुभव ?
- मुळात या चित्रपटात सगळे विनोदाचे बादशाह आहेत. यात गिरीश कुलकर्णी यांसारखे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आहेत. प्रत्येकाची विनोदाची वेगळी शैली आहे, टायमिंग आहे आणि विनोदाचे हे विविध प्रकार एकत्र आल्यावर काय धमाल होऊ शकते, याचा आपण विचार करूच शकतो. जशी धमाल या कलाकारांनी पडद्यावर केली आहे. तशीच धमाल आमच्या सेटवरही व्हायची. यात तानाजी गालगुंड आणि मोनालिसा बागल ही नवीन जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातील प्रत्येक जण हा चित्रपट पुढे घेऊन गेला आहे.
'भिरकीट' नेमकं काय आहे ?
- खरंतर 'भिरकीट' हा चित्रपट मातीशी जुळलेला आहे. माणूस हा माणसापासूनच लांब होत चालला आहे. माणसातील माणूसपण हरवत चाललं आहे. हे सर्व लहानपणापासून बघत आल्याने मला ही गोष्ट पुढे पुढे दिसत गेली आणि मी तशीतशी ती कागदावर मांडत गेलो. त्यातूनच 'भिरकीट' बनला. आपल्या आयुष्यात सर्वांमध्ये एक 'भिरकीट' असते. आनंद असो वा दुःख 'भिरकीट' आपल्या मागे लागतंच. विशेषतः 'भिरकीट' हा शब्द खेडेगावात सर्रास वापरला जातो. 'भिरकीट' हे आपल्या मागे लागलेल एक अदृश्य शस्त्र आहे. या चित्रपटात 'भिरकीट' मागे लागल्यावर कशी मजा येते, हे दाखवण्यात आलं आहे. यातून काही संदेश मिळेल. हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट असून प्रत्येकाने कुटुंबासोबत पाहावा, असा हा चित्रपट आहे.
चित्रीकरणासाठी निसर्गरम्य ठिकाण निवडण्याचे कारण?
- या चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वर आणि वाई येथील जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. मी मूळचा साताऱ्याचा असल्याने मला या परिसरातील बरीच ठिकाणं माहीत होती. त्यात या चित्रपटाची कथाच ग्रामीण असल्यामुळे आणि ग्रामीण भागात अफाट निसर्गसौंदर्य असल्याने मी चित्रीकरणासाठी ही ठिकाणं निवडली. छायाचित्रणकाराने प्रत्येक फ्रेम अगदी सुंदररित्या चित्रित केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा संपूर्ण चित्रपट पाहताना आल्हाददायक वाटेल.
No comments:
Post a Comment