'मी पुन्हा येईन'मध्ये दिसणार सत्तेचा घोडेबाजार
सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजच्या माध्यमातून सत्तेचा घोडेबाजार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेबसीरिजचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी चाललेली चुरस यात पाहायला मिळत आहे. अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका असून 'मी पुन्हा येईन'ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.
मोशन पोस्टरमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यात खुर्चीसाठीची चढाओढ दिसत आहे. या चढाओढीत आता ते हातमिळवणी करणार की, दोघांपैकी कोणाची सत्ता स्थापन होणार? हे 'मी पुन्हा येईन' आल्यावरच कळेल. दरम्यान या वेबसीरिजमध्ये राजकारणातील कट- कारस्थाने, नेत्यांची फोडाफोडी आणि मुख्य म्हणजे सध्या चर्चेत असलेले 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, '' खरं सांगायचे तर वास्तवातील राजकारणापर्यंत पोहोचणे आपल्यासारख्यांना शक्यच नाही. मात्र बहुमतासाठी पक्षांची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थाने कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्र म्हणजे 'मी पुन्हा येईन'.''
'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रेक्षकांना असे विषय पाहायला आवडतात. या वेबसीरिजचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नसून राजकारणात घडत असणाऱ्या काही गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती निव्वळ मनोरंजनच्या हेतूने करण्यात आली आहे.''
No comments:
Post a Comment