Saturday, 17 September 2022

हिल्टन, मुंबई येथे १७, १८ सप्टेंबर रोजी "सीकेपी फूड फेस्टिवल"

 


हिल्टन, मुंबई येथे १७, १८ सप्टेंबर रोजी "सीकेपी फूड फेस्टिवल"

होम शेफ प्रांजल श्रोत्री यांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हिल्टन मुंबई येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी सीकेपी फूड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (सीकेपी) हा समाज त्यांच्या मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. ऋतुनुसार मिळणार्‍या भाज्या आणि मांसाहारी पदार्थ एकत्र करून चविष्ट पदार्थ बनवणे, ही त्यांची खासियत. परंतु हे फार कमी जणांना माहीत आहे की, सीकेपींचे मासांहारी पदार्थ जितके चविष्ट असतात, तितकेच त्यांचे शाकाहारी पदार्थही स्वादिष्ट असतात. 


'सीकेपी' हे कायस्थ समाजात मोडतात. सीकेपींचे मूळ हे १७व्या आणि १८व्या शतकात काश्मीरमध्ये असल्याचे बोलले जाते. हा समाज त्यांच्या मुळाशी घट्ट बांधलेला असून खाद्यसंस्कृतीबाबत ते नेहमीच चोखंदळ असतात. प्रत्येक हंगामानुसार, सणासुदीनुसार त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बदल होत असतो. या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या पत्नी प्रांजल श्रोत्री आपल्या पारंपरिक आणि कौटुंबिक पाककृती सादर करणार आहेत. कांद्यातील मटण आणि वडे, खिमा पॅटिस, तळलेली माशांची तुकडी, वडीचा सांबार, रुमाली वड्या, वालाचे बिरडे, चिंबोरीचे कालवण, निनावं, तेलपोळी, कानवले यांसारख्या प्रसिद्ध सीकेपी खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना इथे घेता येणार आहे. 


 जर तुम्ही अद्याप सीकेपी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नसेल, तर हे फेस्टिवल म्हणजे या अनोख्या मेजवानीचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी आहे. आणि जर तुम्ही स्वतः सीकेपीचअसाल तर या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा पारंपरिक आणि आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर ताव मारता येणार आहे.

No comments:

Post a Comment