Thursday, 29 September 2022

नव्या संकल्पनेतील नवे वृध्दाश्रम.... वृध्दासाठी नवी यातनाकेंद्रे...!!!!

 



नव्या संकल्पनेतील नवे वृध्दाश्रम....    वृध्दासाठी नवी यातनाकेंद्रे...!!!!

ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे...मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाहीये, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आईबापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत....

आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना Taken for granted धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून स्वत:च्या करिअरकडे लक्ष दिले आहे. साधारणत: साठी पासष्ठीनंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष इतक्या वर्षाच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो....मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. अशावेळी या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते...पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो....

म्हाताऱ्या अजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असं नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने त्यांना रोज नातवंडांना न्हाऊमाखू घालणं, जेवण देणं, त्यांच्या उत्स्तवाऱ्या करणं, त्यांना हवं नको ते पहाणं हे शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणं भागच होऊन जातं, तोंडा दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचं कसं होणार? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात.....

एकदा जबाबदारी स्विकारली की मग स्वत:चं आरामाचं वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधलं जातं...लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणं इथपासुन ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामं करावी लागतात..

नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमीजास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की..."लक्ष कुठे असतं हो तुमचं?" किंवा "तुमच्याच आईने काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला..." असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना...

कधीकधी तर संध्याकाळी सुन किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या जेवणाचंही सासुबाईंनाच बघावं लागतं....सुन असते हाय-क्वालिफाईड...त्यामूळे तिला बोलून चालणार नसतं...एखादा शब्द जर कमीजास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघू लागतो....वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत...इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत, थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आईबाप चार महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. कालपरवापर्यंत मुलाच्या अमेरिकन नोकरीचं कौतुक करणारे काकाकाकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचं नावही घेत नाहीत त्यामागे हीच कारणं आहेत.

तुम्हाला मुलंबाळं जन्माला घालून जर त्यांचं करणं झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे-केअर सेंटरवर ठेवा की....तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलंच जन्माला घालु नका हे बेस्ट नाही का?...आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. हे नवे "बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रम" आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे....!!!



*✍️ Anamik

No comments:

Post a Comment