रायगडच्या भूमिपुत्रांकडून 'हरिओम'ची निर्मिती, म्हणजे अभिमानाची बाब - पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी
शिवप्रेमाने झपाटलेल्या दोन मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी म्हणजे 'हरीओम'. आजच्या युवा पिढीमध्ये शिवप्रेमाची भावना जागवण्याचा प्रयत्न करणारा 'हरीओम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील कलाकार हरिओम घाडगे आणि गौरव कदम यांनी नुकतीच रेवदंडा येथील ज्येष्ठ प्रवचनकार, समाजसेवक पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी चित्रपटाचे कौतुक करत, प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, '' रायगडच्या भूमिपुत्रांकडून ऐतिहासिक आणि शिवभक्तीपर चित्रपटाची निर्मिती होणे, ही अभिमानाची बाब आहे. कलाकारांचा अभिनय मनाला खोलवर भावणारा असून तरुणांनी हा चित्रपट बघून शिवभक्ती, बंधुप्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा या प्रेरक संदेशाचे अनुकरण करावे, ही काळाची गरज आहे. अतिशय आक्रमकता, धाडस, शौर्य, साहस आदींचा मिलाप 'हरीओम'च्या अभिनयातून दिसून येतो. या चित्रपटातील कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. या भूमिका अभिनय नसून खऱ्या वाटत आहेत. उत्तम कलाकार, संगीत, कथानक, संवाद यांमुळे का चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरेल.''
श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असून ‘हरिओम’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर राज सुरवाडे आहेत. येत्या १४ ऑक्टोबरला 'हरिओम' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment