‘परिनिर्वाण'मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास..
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलितांचा उद्धारकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे एकंदरीत जीवन पाहता, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे! ही ओळ त्यांना अतिशय अनुरूप ठरते. अशा या 'महामानवा'ने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. या मन हेलावणाऱ्या क्षणाचा एक असा साक्षीदार आहे, जो विषमतेच्या वणव्याला न जुमानता, अनेकांना प्रेरणा देत, डौलाने घट्ट उभा राहिला. अशा या महावृक्षाच्या परिनिर्वाणाची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रॅाडक्शन निर्मित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याने आपल्या ‘नॅशनल हिरो’साठी एक असामान्य पाऊल उचलले. नामदेव व्हटकर असे या सामान्य व्यक्तिमत्वाचे नाव असून ही व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार आहेत. नुकत्याच एका भव्य सोहळ्यात ‘परिनिर्वाण’च्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपटाच्या इतर टीमसोबतच नामदेव व्हटकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावरील चित्रफितही दाखवण्यात आली. तसेच नामदेव व्हटकर यांनी टिपलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण यात्रेची आणि गर्दीची क्षणचित्रंही याठिकाणी उपस्थितांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. शैलेंद्र कृष्णा बागडे दिग्दर्शित या चित्रपटाचे सुनिल शेळके निर्माता आहेत तर आशिष ढोले सहनिर्माता आहेत. यात प्रसाद ओक यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत अंजली पाटील असून रोहन - रोहन यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. या प्रसंगी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात पत्रकार सौमित्र पोटे, प्रसाद ओक आणि जयवंत व्हटकर यांचा सहभाग होता.
'परिनिर्वाण'चे मोशन पोस्टर अंगावर अक्षरशः शहारा आणणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकारच नसून ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदारही होते.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शैलेंद्र बागडे म्हणतात, '' एका चित्रपटाविषयी पुस्तक वाचत असताना मला नामदेव व्हटकर यांचा एका ओळीचा संदर्भ सापडला आणि नंतर त्याविषयी मी शोध घेत गेलो. इंटरनेटवरही फार काही माहिती उपलब्ध नव्हती. मग इथेतिथे शोधून त्यांच्या कुटुबियांचा नंबर मिळवला आणि त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांमधून मला बरीच माहिती मिळाली. तिच मांडण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट माहितीपट अथवा चरित्रपट नसून हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. यातून दोन व्यक्तिमत्वांचा समांतर प्रवास आम्ही समोर आणतोय. या चित्रपटात १९२५ ते १९५६चा काळ दाखवण्यात आला असून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देणाऱ्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.’’ चित्रपटाचे निर्माता सुनिल शेळके, सहनिर्माता आशिष ढोले म्हणतात, ‘’ आता आपण तांत्रिकदृष्ट्या खूप पुढे गेलो आहोत मात्र त्या काळी माध्यम, तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही त्या व्यक्तिने एका महामानवाच्या निर्वाण यात्रेचे चित्रीकरण केले, हिच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामागची त्यांची मेहनत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आज ज्याप्रमाणे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे तसेच नामदेव व्हटकर यांचे कार्यही जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचायला हवे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे .’’
'नामदेव व्हटकर' यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रसाद ओक म्हणतात, ''जेव्हा एखादा सिनेमा माझ्याकडे येतो तेव्हा मी माझी भूमिका बघण्याआधी सिनेमा काय आहे, ते बघतो मग त्या सिनेमात माझी व्यक्तिरेखा काय करतेय, ते बघतो. या चित्रपटाची संहिता ऐकताना पहिल्या पानापासून काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्याचे जाणवले. मला नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारायला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. नामदेव व्हटकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. प्रत्येक वाटेवरचा त्यांचा प्रवास अत्यंत अवघड होता आणि लेखकाने तो अतिशय सुंदर गुंफला आहे. ती सुंदरता आणि सहजता पेलवून नेण्याकरता माझा कस लागणार आहे. परिनिर्वाण झाल्यानंतर मोक्ष मिळतो. मात्र त्यासाठी माणसाला मृत्यू यावा लागतो. परंतु मला जीवंतपणी परिनिर्वाण करायला मिळणार आहे. ही कलाकृती आम्ही उत्तम करू शकलो तर प्रेक्षकांना आणि आम्हालाही समाधानाचा मोक्ष मिळणार आहे.’’ तर नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र जयवंत व्हटकर म्हणतात, '' आज आम्ही भावंडं जे काही घडलो ते आमच्या वडिलांमुळेच. आमच्यात जो काही बदल आहे, त्यामागे वडिलांचीच पुण्याई आहे. माझ्या वडिलांमध्ये परिस्थितीशी झगडण्याचा गुण होता. ही फिल्म ज्यावेळी त्यांनी बनवली तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. मात्र वडिल जाण्यापूर्वी आमची या विषयावर चर्चा व्हायची. या ‘महामानवा’ने आपल्या समाजासाठी विशेषत: अस्पृश्य समाजासाठी आपले रक्त आटवले आहे, त्यामुळे त्यांचे महत्व आजच्या पिढीसमोर, घराघरांत पोहोचवण्याचा माझ्या वडिलांचा प्रयत्न होता. या महायात्रेच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आमचे घर गहाण ठेवले होते, छापखानाही विकला होता. ''
No comments:
Post a Comment