Monday 8 May 2023

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांना परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याचे भयाण वास्तव प्रेक्षकांना ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'बलोच' या चित्रपटात अनुभवायला मिळत आहे. खरंतर हा चित्रपट म्हणजे सीमेपार लढलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या स्पर्धेत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट असतानाही प्रेक्षक 'बलोच' चित्रपटाकडे वळताना दिसत आहे. मराठयांची ही शौर्यगाथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली असून अनेकांनी सोशल मीडियावरून 'बलोच'बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाकारांचे, दिग्दर्शकांचे कौतुक होत असतानाच चित्रपटातील गाणीही रसिकांना आवडत आहेत. अंगावर रोमांच आणणारी लढाई आणि दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एक लढवय्या आणि त्याचे सहकारी यांची विजयगाथा सांगणारा हा ऐतिहासिक चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी गोळा करण्यात यशस्वी होत आहे. 


चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, " हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून या सिनेमाचे काम सुरु होते. मुळात हा ऐतिहासिक चित्रपट असल्याने काहीही पडद्यवर दाखवताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची आम्ही हरप्रकारे काळजी घेतली. 

त्यामुळे संपूर्ण इतिहास व्यवस्थित जाणून घेऊन मगच आम्ही तो पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जी चित्रपट पाहताना पडद्यावर दिसतेच. आम्हाला फार आनंद होतोय की, आमची ही मेहनत, आमचा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय. मी  आवाहन करेन, हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा.'' 


अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत,  ‘बलोच’च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

No comments:

Post a Comment