गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या “गजलियत” गजल महफिलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पं. भीमराव पांचाळे यांच्या कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव
गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाच्या कारकीर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील मराठी – उर्दू गजलांची भावगर्भ मैफिल शनिवारी संध्याकाळी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. याप्रसंगी निवृत्त पोलिस उपायुक्त उत्तमराव बोधावडे, निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते प्रमोद पवार, ज्येष्ठ समाजसेविका स्नेहलता संजय अवनखेडकर, अशोक भगत, समाजसेवक विक्रांत आचरेकर, निर्माती – दिग्दर्शिका अश्विनी जालिंदर कांबळे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पं. भीमराव पांचाळे यांना रसिकांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते “गझलसागर” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या मैफिलीचे आयोजन झेन एंटरटेनमेंटच्या निर्माती – दिग्दर्शिका अश्विनी जालिंदर कांबळे यांनी श्री. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगाने केले होते.
गज़लनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील गज़लमय मैफिलीला यादगार करण्यास त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची साथ लाभली. या मैफिलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. कारण भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील रौप्यमहोत्सवी मैफिल जिथे रंगली होती, त्याच शिवाजी मंदिरात सुवर्ण महोत्सवी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुवर्णमहोत्सवी मैफिलीत गझलनवाझ पांचाळे यांनी 'अंदाज आरशाचा', 'आयुष्य तेच आहे', 'तू नभातले तारे माळलेस का तेव्हा', 'मी किनारे सरकताना पाहिले', 'हा असा चंद्र', 'करते थोडी स्वप्ने गोळा' अशा अनेक लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर केल्या. या मैफिलीत गिरीश पाठक (तबला), सुधाकर अंबुसकर (हार्मोनियम), संदीप कपूर (गिटार), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), अब्रार अहमद (संतूर), राशिद खान (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी साथसंगत दिली, तर रवींद्र वाडकर यांनी या मैफिलीचे सूत्रसंचालन केले.
गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांची पहिली गझल मैफल सन १९७२ साली अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गेली ५० पन्नास वर्षे अथकपणे महाराष्ट्रासह देश-विदेशात गझल गायनाचे कार्यक्रम केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना करून आतापर्यंत १० अखिल भारतीय गझल संमेलने आयोजित केली, अनेक गझल लेखन कार्यशाळा घेतल्या, वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले, अनेकांना लिहिते-गाते केले, तसेच अनेक नवोदित गझलकारांच्या गझल संग्रहांचे प्रकाशन केले. आपल्या कार्याद्वारे त्यांनी आपल्या गझलगायनाला चळवळीचे स्वरूप दिले.
No comments:
Post a Comment