हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० नोव्हेंबर, २०२३ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली.
६२ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध १९ स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे
No comments:
Post a Comment