Wednesday 1 November 2023

"उज्वला... एक बालपण असेही!" चा प्रकाशन सोहळा रंगला

 


"उज्वला... एक बालपण असेही!" चा प्रकाशन सोहळा रंगला


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्नेहा संजय फदाले लिखित, वेदांतश्री प्रकाशन पुणे प्रकाशित "उज्वला... एक बालपण असेही!" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा घाटकोपर पूर्व येथील पुणे विद्याभवन महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साहित्यरत्न पुरस्कार विजेत्या कवयित्री फरझाना म. इकबाल डांगे (ईनामदार), लेखक व अध्यापक रमेश थोरात, ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलिमा टेकाडे, पुणे विद्यार्थी गृहाचे विश्वस्त व संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, साहित्यिक संभाजी नवले, लेखिकेच्या शिक्षिका आघरकर आणि मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संचालक गुरुदत्त वाकदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


सोहळ्याची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सर्वच मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक व अध्यापक रमेश थोरात यांनी अगदी सूक्ष्म निरीक्षणे सभागृहासमोर मांडली. त्यांच्या भाषणातून लेखिका स्नेहा फदाले यांची लेखन पद्धती आणि अनुभवाला शब्दबद्ध करण्याची हातोटी खुलासेवार मांडली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सचिन तळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानप्रकाश विद्यालयाचे शिक्षक मतकर यांनी केले. 


स्नेहा संजय फदाले यांनी 'उज्वला... एक बालपण असेही!' या पुस्तकात शब्दबद्ध झालेल्या लहानपणीच्या त्या गोड आठवणी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आपआपल्या बालपणात घेऊन जातील " असे या पुस्तकाचे वर्णन करताना फरझाना डांगे म्हणाल्या. 


पुस्तकाची प्रस्तानवा शैलेश हिंदळेकर यांनी अगदी नेमक्या शब्दांमध्ये केली आहे. पुस्तक प्रकाशना दरम्यान स्नेहा यांच्या मोठ्या मुलाने कपिलने पुस्तकातील काही अंशाचे अभिवाचन करून उपस्थितांमध्ये पुस्तकाबद्दल आकर्षण निर्माण केले आणि छान दादही मिळवली. त्यांचा छोटा मुलगा कार्तिक येणाऱ्या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करत होता. तर पतिराज संजय कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडावा ह्यासाठी जातीने सर्व व्यवस्था पाहात होते.


पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास स्नेहा फदाले यांचे आईवडील, सासूसासरे, मामा, बहिण-दाजी, भाऊ-भावजयी यांच्यासह सारा परिवार, आप्तेष्ट उपस्थित होते. त्या ज्या शाळेत विद्यादानाचं पवित्र कार्य करत आहेत त्या ज्ञानप्रकाश विद्यालयातले सहकर्मी देखील सोहळ्यास उपस्थित होते. त्यांच्यासोबतच स्नेहा यांची बालमैत्रिण पुष्पा वाळुंज करंडे ह्यादेखील उपस्थित होत्या. स्नेहा गिर्यारोहणासाठी ज्या संस्थेसोबत जातात त्यातील काही सहकारी देखील ह्या प्रकाशन सोहळ्यास हजर होते. या प्रकाशन सोहळ्यासाठी नियोजन अत्यंत काटेकोरपणे सांभाळले त्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन स्नेहा फदाले यांनी केले. त्यांच्याच गोड स्वरांत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


1 comment: