*भारतात दिवाळीचा आनंद द्विगुणित; १२ वर्षांनंतर भारत अंतिम फेरीत; न्यूझीलंडकडून २०१९ च्या पराभवाचा घेतला बदला; कोहली-अय्यरनंतर शमीचे वर्चस्व*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर) झालेल्या रोमांचक सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला. भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेवटच्या वेळी २०११ मध्ये टीम इंडियाने घरच्या मैदानावर विजेतेपदाच्या सामन्यात धडक मारली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ विजेता ठरला होता. भारतीय संघ आता १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा सौरव गांगुली कर्णधार होता. आठ वर्षांनंतर, २०११ मध्ये, जेव्हा भारताने अंतिम फेरी गाठली, तेव्हा त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. विश्वचषकात सर्वाधिक सलग सामने जिंकणार्य़ा संघांत ऑस्ट्रेलिया सलग ११ सामने जिंकून प्रथम स्थानी विराजमान आहे. तर भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सलग १० सामनै जिंकले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांवर गारद झाला. भारताच्या विजयात विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीचे योगदान महत्त्वाचे होते. कोहलीने ११७ धावांची तर अय्यरने १०५ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजीचे कौशल्य दाखवत सात विकेट्स घेतल्या. तिघांनी मिळून भारताला सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पराभूत होऊ दिले नाही. टीम इंडियाला २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने शानदार सुरुवात केली. प्रथम रोहितने वेगाने धावा केल्या आणि त्यानंतर गिलने आक्रमक फलंदाजी केली. रोहितने विश्वचषकामध्ये ५० षटकार पूर्ण केले आणि पॉवरप्लेमध्ये टीमची धावसंख्या ५० धावा पार केली. सौदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वैयक्तिक ४७ धावांवर बाद झाला. मात्र, पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाला एका विकेटच्या नुकसानावर ८४ धावा करता आल्या. गिल आणि कोहलीने भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. यादरम्यान गिलने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ६५ चेंडूत ७९ धावा केल्यानंतर गिलला वानखेडेच्या उकाड्याने त्रास झाला. त्याला पेटके येत होते आणि त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता.
विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. त्याने ५९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने सचिनचा ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील ५० वे शतक झळकावले आणि भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे नेली. तो ११७ धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणखीनच आक्रमक झाला. राहुलच्या साथीने त्याने भारताची धावसंख्या ३५० धावांच्या पुढे नेली. यानंतर श्रेयसने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ७० चेंडूत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०५ धावा करून तो बाद झाला. ४९व्या षटकात फलंदाजीला आलेला सूर्यकुमार एक धाव करून बाद झाला. शेवटी लोकेश राहुलने शुभमन गिलच्या साथीने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३९७ धावांपर्यंत नेली. ३९ धावा करून तो नाबाद राहिला. तर शुभमन गिल ८० धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.
न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १३४ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने ६९ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ४१ धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि रचिन हे दोन्ही किवी सलामीवीर १३ धावा करून तंबूमध्ये परतले. भारताकडून मोहम्मद शमीने सात विकेट घेतल्या. तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
No comments:
Post a Comment