काळाची पावले ओळखून पुढे जावे लागेल - प्राचार्या डॉ. छाया पानसे
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्व. गं. द. आंबेकर यांनी विविध समाजसेवी कामातून आदर्श निर्माण केला. परंतु तो आदर्श पुढे नेताना काळाची पावले ओळखून पुढे जावे लागेल, असे विचार महर्षी दयानंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. छाया पानसे यांनी येथे काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांचा ५९ वा स्मृती दिन १३ डिसेंबर २०२३ रोजी महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाला. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्तविक केले. सर्व प्रथम स्व. गं. द. आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर नागपूर अधिवेशनात व्यस्त असले तरी त्यांनी स्पर्धा विजेत्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.
याप्रसंगी गं. द. आंबेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि. ७ ते १३ डिसेंबर पर्यंत आंबेकर स्मृती सप्ताह आयोजित करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते करून त्याची सांगता करण्यात आली. महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर (क्रीडा प्रमुख), सेक्रेटरी शिवाजी काळे, प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल,आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
बदललेल्या काळाचा हवाला देताना डॉ. छाया पानसे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, सध्याचे युग डिजिटल असून, आज आपली 'अपडेट' आणि 'अपग्रेट' जीवनशैली असावयास हवी. आज आपल्याला काळाप्रमाणे बदलावे लागेल. ड्रायव्हरलेस गाडीही आज येऊ घातलीय पण रिटायर्ड होणार्या वाहान चालकांना नवीन तंत्रज्ञान शिकून आपला रोजगार सुरक्षित ठेवावा लागेल. बदललेल्या काळाची पाऊले ओळखून आजच्या पालकांनी कशी पावले उचलावीत, यावर अनेक उदाहरणे देत डॉ. पानसे यांनी आपले विचार मांडले.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते, गं. द. आंबेकरजींच्या रचनात्मक कार्याचा मागोवा घेताना म्हणाले, संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली संघटना घरांच्या प्रश्नावर असेल किंवा बंद एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर असेल संघर्षाच्या भूमिकेतून लढत आहे.
महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले, जे कामगार कायदे आंबेकरजींनी आपल्या लढ्यातून मिळविले, त्याचसाठी आज लढावे लागते आहे.
याप्रसंगी, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडे, महाराष्ट्र इंटकचे सचिव मुकेश तिगोटे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, मिलिंद तांबडे, किशोर रहाटे, साई निकम आदी मान्यवर त्या वेळी उपस्थित होते. खजिनदार निवृत्ती देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment