Saturday, 2 December 2023

ऋतुराजच्या १२३ धावांसमोर मॅक्सवेलच्या १०४ धावा सरस; इशान आणि सूर्याच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताचा पराभव; मॅक्सवेलने केली रोहितशी बरोबरी




ऋतुराजच्या १२३ धावांसमोर मॅक्सवेलच्या १०४ धावा सरस; इशान आणि सूर्याच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताचा पराभव; मॅक्सवेलने केली रोहितशी बरोबरी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तिसर्‍या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ३ गडी गमावून २२२ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत १२३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या पाच षटकांत ७८ धावांची गरज होती, पण त्यांनी ८० धावा करत सामना जिंकला. १५ षटकांनंतर, भारताने तीन विकेट गमावून १४३ धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने पाच विकेट गमावून १४५ धावा केल्या. मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर होते. दोघांनी शानदार भागीदारी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.


ऑस्ट्रेलियाच्या विजयात टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही मोठा वाटा आहे. १८व्या षटकात प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर सूर्यकुमारने मॅथ्यू वेडचा झेल सोडला. त्यावेळी तो सात चेंडूंत पाच धावा करून खेळपट्टीवर होता आणि त्यानंतर त्याने १६ चेंडूंत २८ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी इशान किशनच्या खराब यष्टिरक्षणामुळेही भारताला सामना गमवावा लागला. अक्षर पटेल १९व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याच्या चौथ्या चेंडूवर इशान किशनने मॅथ्यू वेडविरुद्ध स्टंपिंगसाठी अपील केले. तिसऱ्या पंचानी रिप्ले पाहिल्यावर इशानने त्याचे हातमोजे विकेटजवळ आणून चेंडू पकडल्याचे दिसले. वेड बाद झाला नाही, पण त्या चेंडूचे रूपांतर नो बॉलमध्ये झाले आणि ऑस्ट्रेलियाला फ्री-हिट मिळाली. फ्री हिटवर वेडने षटकार ठोकला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही पण तो नक्कीच इशानच्या हातमोल्याला लागून चौकार गेला. या धावांमुळे सामना भारताच्या हातून निसटला


भारतीय संघाला अखेरच्या षटकात १ धावा वाचवाव्या होत्या. प्रसीध कृष्णा गोलंदाजी करत होता, पण टीम इंडिया ह्या धाव वाचवू शकली नाही. मॅक्सवेल आणि वेडने ९१ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.  शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेडने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. यानंतर मॅक्सवेलने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला.  मॅक्सवेलने पाचव्या चेंडूवर चौकार मारून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले.  त्याने ४७ चेंडूत शतक झळकावले.


शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला दोन धावांची गरज होती आणि मॅक्सवेलने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने ४८ चेंडूत १०४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.  त्याचवेळी, मॅथ्यू वेडने १६ चेंडूत २८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. मॅक्सवेल आता रोहित शर्मासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे.  या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पुनरागमन केले आहे. मालिकेत भारत अजूनही २-१ ने आघाडीवर आहे.  या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये १ डिसेंबरला होणार आहे.


नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने २० षटकांत ३ गडी गमावून २२२ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत १२३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय तिलक वर्मा २४ चेंडूत  धावा करून नाबाद राहिला.  चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५९ चेंडूत १४१ धावांची नाबाद भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाने २० व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजीसाठी पाचारण केले. २० वे षटक मॅक्‍सवेलचे पहिले षटक होते आणि या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारला. भारताने २०व्या षटकात ३० धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात ७९ धावा केल्या. टी-२० मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका षटकात २७ धावा देणाऱ्या ब्रेट लीचा विक्रम मोडला.

 

No comments:

Post a Comment