भारताच्या 'बैजबॉल' पुढे इंग्लंडची शरणागती; जडेजा-अश्विनच्या भेदक गोलंदाजी नंतर यशस्वीची झंझावाती फलंदाजी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून ११९ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल ७० चेंडूत ७६ धावा करुन नाबाद असून शुभमन गिल ४३ चेंडूत १४ धावा करून नाबाद आहे. आतापर्यंत दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी झाली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने आतापर्यंत पहिल्या डावात केवळ २३ षटके फलंदाजी केली असून एक विकेट गमावली आहे. त्यांच्याकडे अजूनही तिन्ही रिव्ह्यू बाकी आहेत, पण इंग्लंडने आधीच तिन्ही रिव्ह्यू गमावले आहेत. या डावात पंचांना आव्हान देण्यासाठी त्यांच्याकडे आता कोणतेही पुनरावलोकन शिल्लक नाही. पहिल्या दिवशी ११ विकेट पडल्या आणि ३६५ धावा झाल्या. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर संपला. भारत अजूनही या धावसंख्येपेक्षा १२७ धावांनी मागे आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात चांगली झाली. जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. १२व्या षटकात एकही विकेट न गमावता ५५ धावा झाल्या होत्या, तर १६व्या षटकात संघाने तीन धावा करताना तीन विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडची धावसंख्या ५८ धावांत तीन विकेट्स अशी झाली. डकेट ३५ धावा करून बाद झाला आणि ऑली पोप एक धाव काढून बाद झाला. तर क्रॉलीला २० धावा करता आल्या. डकेट आणि क्रॉलीला अश्विनने तंबूमध्ये पाठवले. त्याचवेळी पोपला जडेजाने बाद केले.
उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १०८ धावा होती. उपाहारानंतर बेअरस्टो आणि रूट बाद झाले. अक्षरने बेअरस्टोचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याला ३७ धावा करता आल्या. त्याचवेळी जडेजाने जो रूटला जसप्रीत बुमराहकडे झेलबाद केले. त्याला ६० चेंडूत २९ धावा करता आल्या. बेन फॉक्स चार धावा करून अक्षरचा दुसरा बळी ठरला. त्याचवेळी बुमराहने रेहान अहमदला यष्टिरक्षक केएस भरतकडे झेल देण्यास भाग पाडले.
जडेजाने इंग्लंडला आठवा धक्का दिला. त्याने टॉम हार्टलीला बाद त्रिफळाचीत केले. त्याचवेळी अश्विनने मार्क वूडचा त्रिफाळा उध्वस्त केला आणि बुमराहने स्टोक्सला त्रिफळाचीत केल्याने इंग्लंडचा डाव २४६ धावांवर आटोपला. बाद होण्यापूर्वी स्टोक्सने ८८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी तीन तर बुमराह आणि अक्षर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. अलीकडच्या काळात इंग्लंडने नव्या शैलीचे क्रिकेट खेळले आहे. कसोटीमध्ये याला बैजबॉल क्रिकेट असे म्हणतात, जे इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. वास्तविक, मॅक्युलमचे टोपणनाव बॅज आहे. त्यामुळे तो आणि स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली, ज्याला बैजबॉल म्हटले जाते. आता हैदराबाद कसोटीत इंग्लंड नव्हे तर भारत अशी फलंदाजी करताना दिसला.
भारताने १२ षटकात एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या होत्या. टीम इंडिया सातच्या आसपास धावगती करत होती. रोहित बाद होईपर्यंत हे सुरूच होते. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. त्याला २७ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने २४ धावा करता आल्या. रोहित १३व्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर टीम इंडियाने पुढील १० षटकात केवळ ३९ धावा जोडल्या. शुक्रवारी पहिल्या सत्रात एकही विकेट पडू न देण्याचा यशस्वी आणि शुभमनचा उद्देश असेल.
No comments:
Post a Comment