महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, २३ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, १७ मार्च रोजी दिल्लीत अंतिम फेरी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला प्रीमियर लीग २०२४ (डब्ल्यूपीएल २०२४) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही एकूण पाच संघ २२ सामने खेळणार आहेत. मात्र, यावेळी मोठा बदल दिसून आला आहे. वास्तविक, गेल्या वर्षी ही लीग मुंबई आणि नवी मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवण्यात आली होती. मात्र, यावेळी या लीगचे यजमानपद मुंबईऐवजी बेंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे.
हे सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. दोन्ही मैदानांनी प्रत्येकी ११ सामने आयोजित केले आहेत. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील बंगळुरूमधील सामन्याने होईल. महिला प्रीमियर लीगचे हे दुसरे पर्व आहे आणि गेल्या वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ चॅम्पियन बनला होता. त्याने अंतिम फेरीत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.
स्पर्धेतील पहिले ११ सामने बेंगळुरू येथे खेळवले जातील. यानंतर, पाचही संघ दिल्लीला येतील, जिथे एलिमिनेटरसह अंतिम सामना खेळला जाईल. साखळी फेरीत २० सामने खेळवले जातील आणि त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामने खेळवले जातील. साखळी फेरीत अव्वल असणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर खेळतील. २४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकही डबल हेडर सामना खेळला जाणार नाही. दररोज एकच सामना होईल. १५ मार्चला एलिमिनेटर आणि १७ मार्चला अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल. सगळे सामने संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत.
डब्ल्यूपीएल साठी पाच संघ पुढीलप्रमाणे आहेत:-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी)
गुजरात जायंट्स (जीजी)
मुंबई इंडियन्स (एमआय)
दिल्ली कॅपिटल्स (डीसी)
यूपी वॉरियर्स (युपीडब्ल्यू)
No comments:
Post a Comment