Thursday, 15 February 2024

जडेजाने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, कपिल देव आणि अश्विनच्या क्लबमध्ये सामील; भारत ३२६/५

 


जडेजाने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, कपिल देव आणि अश्विनच्या क्लबमध्ये सामील; भारत ३२६/५


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याच्या घरच्या मैदानावर राजकोटमध्ये शानदार शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली. जडेजाने सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (५ फेब्रुवारी) नाबाद ११० धावा केल्या. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. जडेजाने आतापर्यंत २१२ चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि दोन षटकार आले.


जडेजाने राजकोटमध्ये शतक झळकावून मोठी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा करणारा आणि किमान २०० बळी घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी माजी कर्णधार कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी ही कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी कसोटी कारकिर्दीत ५२४८ धावा केल्या. त्यांनी गोलंदाजीत कमाल केली आणि ४३४ बळी घेतले. अश्विनबद्दल बोलायचे झाले तर त्याने ३२७१ धावा करत ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाच्या खात्यात ३००३ धावा आणि २८० विकेट जमा आहेत.


जडेजाने १ जुलै २०२२ नंतर कसोटीत पहिले शतक झळकावले आहे. हे त्याचे कारकिर्दीतील चौथे शतक आहे. त्याचवेळी राजकोटमध्ये त्याने सात वर्षांनंतर शतक झळकावले आहे. गेल्या वेळी ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या. राजकोटमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जडेजाचा विक्रम उत्कृष्ट आहे. या मैदानावर त्याने आपले सहावे शतक झळकावले आहे. त्याचा या मैदानावरील हा १२ वा सामना आहे. जडेजाने १७ डावात १५६४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी १४२.१८ इतकी आहे. जडेजाने सहा शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३३१ आहे.


कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसाचा खेळ संपल्यावर त्याचा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी ५ गड्यांच्या मोबदल्यात ३२६ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने १३१ धावा केल्या. तर जडेजा ११० धावा करून नाबाद राहिला. सर्फराज खानने कारकिर्दीतील पहिल्या डावात तुफानी फलंदाजी करत ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याने नऊ चौकार आणि एक षटकार मारला. यशस्वी जैस्वाल १० धावा करून तंबूमध्ये परतला आणि रजत पाटीदारने पाच धावा केल्या. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजासह कुलदीप यादव (एक धाव) नाबाद राहिला. इंग्लंडकडून मार्क वुडने तीन बळी घेतले. टॉम हार्टलीला एक यश मिळाले.


No comments:

Post a Comment