Wednesday, 28 February 2024

स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे - संतोष पवार

 


स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे - संतोष पवार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘‘योग्य वयात स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाची तयारी केलीत तर यश तुम्हांला मिळणारच. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मानसिकरीत्या तयार असणे आवश्‍यक असते. परीक्षांच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे, उत्तर देण्याची पद्धत आणि विचारांची अचूकता, विचारांची क्षमता वाढविणे, परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढविणे, चाकोरी बाहेरचा विचार करणे आणि हे सारे करत असताना यश-अपयश पचवण्याची ताकत निर्माण करणे.  विद्यार्थ्यांना असामान्य कर्तृत्व दाखवायचं असेल तर स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे,’’ असे मत सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती. माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘प्रशासकीय सेवा आणि मराठी भाषा’ या विषयावर विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना ‘ओंकार करिअर अकॅडमी’चे संचालक संतोष पवार यांनी उद्गारले. स्पर्धापरीक्षेसाठी तयारी करताना शालेय स्तरावरचा अभ्यास महत्वाचा आहे. स्पर्धापरीक्षेबद्दलची भीती आणि गैरसमज काढून टाका, प्रयत्न करा यश तुमचेच आहे असे ही आवाहन मार्गदर्शनपर व्याख्यानात पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या. 

             

‘ध्यास मराठी श्वास मराठी’ ह्या गीताने प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी मनाली मणचेकर हिने कार्यक्रमाची सुंदर सुरूवात करून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कलाशाखा प्रमुख प्रा. रेणुका प्रजापती यांनी महाविद्यालयाच्यावतीने प्रमुख पाहुणे संतोष पवार आणि सर्व उपस्थितांचे स्वागत करून सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राची गुढेकर ह्या विद्यार्थिनीने कुसुमाग्रजांचा संपूर्ण माहितीपट मांडला. माजी विद्यार्थिनी माधवी पवार हिने ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘प्रतापगडाच्या पायथ्याशी खान’ हा पोवाडा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सुप्रिया शिंदे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. सदर कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या

No comments:

Post a Comment