Saturday, 17 February 2024

भारताची सामन्यावर पकड, गोलंदाजांनंतर यशस्वी-गिलने दिली मोठी आघाडी



 भारताची सामन्यावर पकड, गोलंदाजांनंतर यशस्वी-गिलने दिली मोठी आघाडी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३२२ धावांची आघाडी मिळवली. १०४ धावा केल्यानंतर जैस्वाल दुखापतग्रस्त होऊन तंबूमध्ये परतला. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या होत्या. भारताने १२६ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली.


आज इंग्लंडने २ बाद २०७ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि ११२ धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. शुक्रवारी जॅक क्रोली (१५) आणि ऑली पोप (३९) बाद झाले. बुमराहने शनिवारी विकेटचे खाते उघडले आणि त्याने जो रूटला तंबूमध्ये पाठवले. यानंतर पुढच्याच षटकात कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, बेन डकेटने १५० धावा पूर्ण केल्या. मात्र, यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. कुलदीपने फिरकीची जादू दाखवत शुभमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याला १५१ चेंडूत २३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५३ धावा करता आल्या.


शनिवारी उपाहारापर्यंत बेन स्टोक्स आणि बेन फोक्स नाबाद होते. उपाहारातून परत येताच इंग्लिश संघाला लागोपाठ दोन चेंडूत दोन धक्के बसले. इंग्लंडच्या डावाच्या ६५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. त्याला ४१ धावा करता आल्या. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर म्हणजेच ६६व्या षटकात मोहम्मद सिराजने बेन फॉक्सला रोहितकरवी झेलबाद केले. फॉक्स १३ धावा करून बाद झाला. ३१४ धावांवर इंग्लंडला आणखी दोन धक्के बसले.


सिराजने रेहान अहमदला त्रिफळाचीत  केले. त्याला सहा धावा करता आल्या. पुढच्याच षटकात जडेजाने टॉम हार्टलीला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित केले. यानंतर सिराजने जेम्स अँडरसनला (१) यष्टी उध्वस्त करून इंग्लंडचा डाव ३१४ धावांवर संपवला. भारताकडून सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराह-अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताने १२६ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. जैस्वालने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक झळकावले. याआधी त्याने विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याचवेळी पहिल्या डावात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करू शकला. सध्या शुभमन गिल १२० चेंडूत नाबाद ६५ धावा तर कुलदीप यादव १५ चेंडूत ३ धावा करून नाबाद खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३२२ धावांची आघाडी नोंदवली होती.


राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. शनिवारी (१७ फेब्रुवारी) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यशस्वीने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने १०४ धावा केल्या. यशस्वीने १३३ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट ७८.२० होता. यशस्वीने १२ जुलै २०२३ रोजी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने १३ डावात फलंदाजी केली आहे. त्याचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. कसोटीत सर्वात जलद तीन शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. या बाबतीत त्याने भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि संजय मांजरेकर यांची बरोबरी केली.

राजकोट कसोटीत भारताकडून आतापर्यंत तीन फलंदाजांनी शतकी खेळी खेळली आहे. पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने १३१ आणि रवींद्र जडेजाने ११२ धावा केल्या. यशस्वीने या कसोटीत संघासाठी तिसरे शतक झळकावले. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतासाठी एका कसोटीत किमान तीन फलंदाजांनी शतके झळकावली होती. योगायोगाने तो सामनाही राजकोटमध्येच झाला होता. त्यावेळी विराट कोहलीने १३९, नवोदित पृथ्वी शॉने १३४ आणि रवींद्र जडेजाने १०० धावा केल्या. जडेजाचे हे घरचे मैदान असून येथे त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत.



No comments:

Post a Comment