Friday, 15 March 2024

ॲलिस पेरीच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथमच महिला प्रिमियर लिगच्या अंतिम फेरीत; गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव


 ॲलिस पेरीच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथमच महिला प्रिमियर लिगच्या अंतिम फेरीत; गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या सीझन २ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने गतवर्षीच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला. बंगळुरूचा संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. १७ मार्चला बेंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.


नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत ६ बाद १३० धावाच करू शकला.


प्रथम फलंदाजीला आलेल्या बेंगळुरू संघाची सुरुवात खराब झाली. संघाने २० धावांत दोन गडी गमावले होते. सलामीवीर स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन प्रत्येकी १० धावा करून तंबूमध्ये परतल्या. अशा स्थितीत एलिस पेरीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी खेळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. रिचा घोषने १४ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून हेली मॅथ्यू, नताली सीव्हर-ब्रंट आणि सायका इशाकने २-२ बळी घेतले.


१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. २७ धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. यास्तिका भाटिया १९ धावा करून बाद झाली तर हेली मॅथ्यूज १५ धावा करून बाद झाली. मधल्या फळीत नताली सीव्हर-ब्रंटने २३, कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ धावा आणि अमेलिया केरने नाबाद २७ धावा केल्या. या तिघींना मोठी खेळी खेळता आली नाही. बेंगळुरूकडून श्रेयंका पाटीलने दोन गडी बाद केले.


No comments:

Post a Comment