भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत !
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : नोकरीनिमित्ताने पुणे-मुंबई तसेच पुणेलगतच्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पुण्याहून लगतच्या जिल्ह्यांमध्ये नोकरीच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांना भल्या पहाटे घर सोडावे लागते, तसेच घरी येण्यास रात्री उशीरही होतो. अशावेळी दिवस असो वा रात्र या भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरुन चालणाऱ्यांचा चावा घेणे, पाठलाग करणे, गुरगुरणे आदी तक्रारी लोकांकडून येत असतात.
वस्त्यांबाहेर असलेल्या कचराकुंडांच्या जागा या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य असते. पुण्यातील भवानी पेठ, हरका नगर, काशीवाडी, जुना मोटर स्टॅण्ड, आदि भागांमध्ये अशा भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. बऱ्याच ठिकाणी लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते आपल्या मुलांना एकटे कुठे सोडण्यास धजावत नाहीत. पहाटे घर सोडणाऱ्या आणि रात्री उशीरा कामावरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी, अशी व्यथा अनेकांनी आमच्या पर्यंत पोहोचवली.
हैदराबाद येथील एका लहान मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना अलिकडेच घडली आहे. पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तथापि, पुणे महानगरपालिका प्रशासन यासंदर्भात अनभिज्ञ असून नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. भटक्या कुत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी या विभागांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर करित आहेत.
No comments:
Post a Comment