जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न
मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे "आई". जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे "आई". प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चूका किंवा अक्षम्य अपराध पोटात सामावून घेणारी व्यक्ती म्हणजे "आई". ह्याच आईवर अगणित वेळा लिहिलं गेलं आहे आणि यापुढेही लिहिले जाईल. आईबद्दलच्या आपल्या भावना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील प्रथितयश कवयित्री सीमा विश्वास मळेकर ह्या विराजमान होत्या. त्यांचे शाल, शब्दगुच्छ अर्थात पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन कवयित्री वैभवी गावडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.
कविसंमेलनामध्ये स्वाती हेमंतकुमार शिवशरण, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, विक्रांत मारूती लाळे, प्रसाद यशवंत कोचरेकर, वैभवी विनीत गावडे, गौरी यशवंत पंडित, जयश्री हेमचंद्र चुरी, संतोष धर्मराज मोहिते, शैलेश भागोजी निवाते, कल्पना दिलीप मापूसकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, आदित्य प्रदीप भडवळकर, किशोरी शंकर पाटील, सुनिता पांडुरंग अनभुले, सरोज सुरेश गाजरे, अशोक नार्वेकर आणि कविसंमेलनाच्या आयोजनाचा महत्त्वाचा भाग असलेले सनी आडेकर यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडीची कविता सादर करून सभागृह भारून टाकले.
No comments:
Post a Comment