वेस्ट इंडिजचा विश्वचषकातील पहिला विजय, पीएनजीवर पाच गडी राखून मात, सेसे बाऊची मेहनत व्यर्थ
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये क गटातील पहिला सामना आणि दिवसाचा दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या पीएनजी संघाने सेसे बाऊच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ८ गडी गमावून १३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १९ षटकांत ५ गडी गमावून १३७ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलच्या संघाने सहा चेंडू शिल्लक असताना पाच गडी राखून सामना जिंकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात धक्कादायक होती. एली नाओने जॉनसन कार्ल्सला बाद केले. तो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. यानंतर निकोलस पुरनने डाव सावरला. त्याने सलामीवीर ब्रँडन किंगसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. जॉन करिकोने नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यष्टिरक्षक फलंदाज पूरनला बाद केले. तो एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा करू शकला. तर किंग ३४ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात रोव्हमन पॉवेल १५ धावा करून बाद झाला तर रदरफोर्ड दोन धावा करून बाद झाला. डेथ ओव्हर्समध्ये रॉस्टन चेज आणि आंद्रे रसेल यांनी सूत्रं आपल्या हातात घेतली. दोघांमध्ये ४० धावांची नाबाद भागीदारी झाली. पीएनजीविरुद्ध रॉस्टनने ४२ तर रसेलने १५ धावा केल्या. पीएनजीसाठी असद वालाने दोन तर एली, सोपर आणि करिको यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
टी२० विश्वचषक स्पर्धेत पापुआ न्यू गिनीसाठी अर्धशतक झळकावणारा सेसे बाऊ हा दुसरा फलंदाज ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या खेळाडूने ४३ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि एक षटकार आला. बाऊच्या आधी हा पराक्रम पीएनजीचा कर्णधार असद वाला याने केला होता. या अर्धशतकापूर्वी, टी२० विश्वचषकात पीएनजीसाठी अर्धशतक करणारा तो एकमेव फलंदाज होता.
पीएनजीने वेस्ट इंडिजविरुद्ध २० षटकांत आठ गडी गमावून १३६ धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पीएनजीची सुरुवात विशेष झाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेल्या टॉनो ऊराला केवळ दोन धावा करता आल्या. पाच धावांच्यावर त्याला रोमारियो शेफर्डने बाद केले. यानंतर संघाला लीगा सियाकाच्या रूपाने दुसरा धक्का बसला. तो केवळ एक धाव करून तंबूमध्ये परतला. यानंतर सेसे बाऊ आणि कर्णधार असद वाला यांनी सामन्याचा ताबा घेतला. दोघांमध्ये २७ धावांची भागीदारी झाली जी अल्जारी जोसेफने भेदली. वेस्ट इंडिजविरुद्ध, असद वाला २१ धावा करून बाद झाला. या सामन्यात सेसेने ५ धावा, हिरी हिरीने २ धावा, चार्ल्स एमिनीने १२ धावा, किप्लीन डॉर्जियाने २७ धावा (नाबाद), चैड सोपरने १० धावा, एली नाओने ० धावा आणि काबुआ मोरियाने २ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रसेल आणि जोसेफने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
रॉस्टन चेजला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्याचा पहिला सामना सकाळी ६ वाजता नामिंबीया आणि ओमान यांच्यात रंगणार आहे तर रात्री ८ वाजता श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे.
No comments:
Post a Comment