महिला कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की सोडत नाहीत - खा. शरद पवार
यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो. कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की, महिला ती संधी सोडत नाहीत, असे मत खासदार शरद पवार यांनी आज २२ जून २०२४ रोजी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध उद्योजिका पद्मश्री आणि माजी खासदार अनू आगा यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदर वंदना चव्हाण, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह हेमंत टकले, जयदेव गायकवाड, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, रोहिणी खडसे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, विविध लोकप्रतिनिधी, सहकारी, पत्रकार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लेखिका मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना यशस्विनी साहित्य सन्मान, कलावती सवंडकर (हिंगोली) यांना यशस्विनी कृषी सन्मान, संध्या नरे-पवार (मुंबई) यांना यशस्विनी पत्रकारिता सन्मान, रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना यशस्विनी सामाजिक सन्मान, राजश्री गागरे (भोसरी-पुणे) यांना यशस्विनी उद्योजकता सन्मान आणि श्रद्धा नलमवार (नाशिक) यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संध्या नरे-पवार संपादीत व यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सकाळ प्रकाशन निर्मित 'धोरण कुठवर आलं गं बाई' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार, अनु आगा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात महिला धोरणाच्या तीन दशकीय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, 'हा केवळ सन्मान नसून महिलांच्या कष्टाचा आणि त्यागाचा गौरव आहे. समाज आणि घराला शिस्त लावणारी स्त्री कर्तबगार असते. आयुष्यात राजकीय निर्णय घेतला, तेव्हा मलाही पहिल्यांदा आईनेच प्रोत्साहन दिले होते. कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून गांधी, नेहरू यांचे विचार आवडायचे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेब यांची वैचारिक व सामाजिक भूमिका स्वीकारून राजकीय वाटचाल बळकट केली. महिला धोरण अंमलात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून त्यानंतर देशाने ते धोरण स्वीकारले, याचा आनंद आहे'.
वर्तमान काळात सगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. त्यामुळे महिला दिन हा उत्सव एक दिवस साजरा करण्यापेक्षा महिलांना सन्मानाची वागणूक व परस्पर आदरभाव देवून वर्षभर महिला दिन साजरा करायला हवा. तेव्हाच महिला धोरणासारखे धोरणात्मक निर्णय यशस्वी होतील. सध्या महिला फारच नावलौकिक मिळवत आहेत. परंतु त्यांनी बचत गटासोबतच नवीन तंत्रज्ञान सुध्दा आत्मसात केले पाहिजे. वाढत्या सोशल माध्यमांच्या काळात डीपफेक, डार्कनेट हे प्रतिमा मलीन करणारे मार्ग ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी सजग व जागरूक राहून काम करायले हवे, अशी अपेक्षा कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना पद्मश्री अनु आगा म्हणाल्या की, 'प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचे सक्षम उदाहरण म्हणजे आजचे आपल्या पुरस्कारार्थी आहेत. म्हणून समाज, परिवार आणि नातेवाईक यांनी काहीतरी करू पाहाणाऱ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आपला महाराष्ट्र महिला धोरणात कायम पुढे राहिला आहे. त्यामुळे महिला कर्तृत्वाच्या इतिहासात महाराष्ट्र अनेक पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल'.
... तेव्हा सरकारमध्ये नव्हतो!
आमची आई फार शिस्तप्रिय होती. तीने आम्हा भावंडांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलो आणि यशस्वी झालो. परिणामी, आमच्या घरात आम्हा भावांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सारखे मानाचे पुरस्कार मिळाले. पण, विशेष म्हणजे त्यावेळी मी सरकारमध्ये नव्हतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
....म्हणून रिल्समध्ये रिस्क असते.
आज प्रत्येक व्यक्ती सोशल मिडियाच्या आहारी गेला आहे. त्यातून स्टंटबाजी वाढली आहे. त्यामुळे रिल्स काढताना अनेकदा जीव धोक्यात घालणारे युवक युवती आपल्या अवतीभवती दिसतात. त्यांना वेळीच रोखायला हवे. तीस सेकंदाच्या रिल्सपेक्षा तुमचा जीव लाखमोलाचा आहे. हे लक्षात ठेवून स्वतःला मर्यादा घालून घ्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
...अन् मागे वळून पाहातो तर काय? सगळे सहकारी गायब!
कॉंग्रेस पक्षात असताना महिला धोरणाविषयी संसदेत बोलत होतो; तेव्हा समोरून चिठ्ठी आली. त्यात मागे वळून पाहा, असे म्हटले होतो. म्हणून मी मागे वळून पाहिले तर काय आश्चर्य. आमचे ७० टक्के सहकारी गायब झाले होते. म्हणजे महिला धोरण अंमलात आणताना केवळ राज्यात नव्हे तर, देशात सुध्दा विरोध झाला होता. परंतु, सगळ्यांना सोबत घेवून ते धोरण यशस्वी करता आले, याचे मोठे समाधान आहे, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.
...स्टेजवरचे 'ते' दोघे कधीही न थांबणारे आहेत!
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खा. सुप्रिया सुळे यांनी महिला धोरण, इतिहास आणि यशाचा टप्पा अधोरेखित केला. इच्छा शक्तीची काही उदाहरणे देताना खासदार शरद पवार आणि पद्मश्री अनु आगा यांच्याकडे हात करून स्टेजवरचे 'ते' दोघे कधीच न थांबणारे आहेत! असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सुळे यांना प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment