अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २१ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. सुपर-८ चा हा महत्त्वाचा सामना होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर गारद झाला.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात पॅट कमिन्सने इतिहास रचला. त्याने सलग दुसऱ्या टी२०मध्ये विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. अफगाणिस्तानपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात कमिन्सने ही कामगिरी केली होती. यासह कमिन्सने इतिहास रचला आहे. टी२० विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. इतकंच नाही तर लसिथ मलिंगाला त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीत तो रेकॉर्ड करता आला नाही.
अफगाणिस्तानच्या डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने राशिद खानला बाद केले होते. यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर करीम जनात आणि गुलबदिन नायब यांना बाद झाले. तत्पूर्वी, बांगलादेशविरुद्ध कमिन्सने डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले होते. त्याने महमुदुल्लाला (२) त्रिफळाचीत बास केले आणि मेहदीला (०) झंपाकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कमिन्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहीद हृदयॉय (४०) याला बाद करून विशेष कामगिरी केली.
कमिन्स आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊथी, सर्बियाचा मार्क पावलोविक आणि माल्टाचा वसीम अब्बास यांनी ही कामगिरी केली होती. कमिन्स हा पाचवा गोलंदाज आहे. तथापि, सलग दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही आठवी हॅट्ट्रिक ठरली. कमिन्सने यापैकी दोनदा ही कामगिरी केली आहे. सात गोलंदाजांनी आठ हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकात हॅटट्रिक घेतली आहे. कमिन्सशिवाय ब्रेट लीने २००७ मध्ये ही कामगिरी केली होती. कमिन्स हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. एकवेळ अफगाणिस्तान संघाने एकही विकेट न गमावता ११८ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर ३० धावा करताना संघाने सहा विकेट गमावल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 95 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. स्टॉइनिसने गुरबाजला बाद करून ही भागीदारी भेदली. तो ४९ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६० धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर झाम्पाने १७व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाई आणि इब्राहिम झद्रान यांना बाद केले. झाद्रानने ४ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. ओमरझाईने दोन धावा केल्या. करीम जनात १३ तर कर्णधार राशिद खानला दोन धावा करता आल्या. मोहम्मद नबी १० धावा करून नाबाद राहिला.
अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण मॅक्सवेलने त्याच्याकडून विजय हिसकावून घेतला. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने अशी कोणतीही चूक केली नाही आणि किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि दोन टी२० सामने खेळले गेले आहेत. एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा संघ कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकू शकला नाही, मात्र टी२० च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम जद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत १२७ धावांवर गारद झाला. गुलबदिन नायबने ४ विकेट घेतल्या.
या सामन्यात एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ३२ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिससोबत ३९ धावांची भागीदारी केली. नायबने स्टॉइनिसला बाद करून ही भागीदारी भेदली. इथून सामन्याला कलाटणी मिळाली. जेव्हा मॅक्सवेलने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक झळकावले, तेव्हा त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण करून दिली, जेव्हा मॅक्सवेलने अफगाणिस्तानवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अविश्वसनीय खेळी खेळली. असेच पुन्हा होईल असे वाटत होते, पण गुलबदिनने मॅक्सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या.
मॅक्सवेल व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला १५ चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही. ट्रॅव्हिस हेड (०), डेव्हिड वॉर्नर (३), कर्णधार मिचेल मार्श (१२), मार्कस स्टॉइनिस (११), टीम डेव्हिड (२), मॅथ्यू वेड (५), पॅट कमिन्स (३), ॲश्टन अगर (२) आणि ॲडम झाम्पा (९) विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सुपर-८ गट-१ मधील उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रोमांचक झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सुपर-८ सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. दोघेही हरले तर निव्वळ धावगतीच्या आधारावर खेळ रंगेल.
गुलबदिन नायबला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment