कवींनी घातली मेघांना साद आणि बरसल्या "पाऊसधारा"
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पाऊस!किती आनंद देणारा. तसा पावसाळा सर्वांचा आवडता ॠतू. पावसाळ्यात मेघांतून पडण्यार्या जलधारांतून निर्माण होतात निर्सग निर्मित विलोभनीय दृश्यं. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ, वार्यात गारवा मिसळलेला. ऊन्हाने त्रस्त झालेल्या धरणीपासून ते प्राणीमात्रांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस!
बालपणी शाळेला सुट्टी मिळावी म्हणून पावसाला घातलेली भोलानाथाची साद, शेतकरी पेरणी करून, धरणीची ओटी बिजाने भरून घेतो तेव्हा बर्याच दिवसांसाठी वाट बघायला लावणारा तो पाऊस!. आणि कधी अचानक हवामान खात्याचे सगळेच अंदाज चुकवून शेतकर्यांच्या गाई-वासरांच्या "मेघमल्हाराला" ऐकून धावत येऊन जोरात पडणारा पाऊस! कित्येक वर्षापासून कोरड्या असणार्या नद्यांना आपल्या खळखळत्या पाण्याने भिजवणारा पाऊस!
माणसांना नवी उभारी देणारा, माणसाच्या हाताला काम देणारा, भूतकाळातल्या गमती-जमतींना उजाळा देणारा रिमझिम बरसणारा हळवा पाऊस. काळ्या भेगा पडलेल्या धरणीसाठी धो-धो कोसळणारा प्रियकर, उनाड, अवखळ पाऊस! किती किती रूपं आहेत ना ह्या पावसाची!!
पण जेव्हा हा असा सर्वांचा आवडता पाऊस दडीमारून बसतो तेव्हा शेतकर्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वांच्या तोंडचे पाणी पळालेले असते. तेव्हा पावसाला प्रत्येकजण साद घालतात, काहीजण तर अगदी देवाला नवस करतात आणि व्याकूळ होतात पावसाच्या दर्शनासाठी. त्यांची अवस्था होते अगदी भेगा पडलेल्या धरणीसारखी. तेव्हा त्या रूसलेल्या पावसाचा रागरुसवा घालण्यासाठी तानसेना सारखी साद घालताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या कवितांच्या मेघमल्हारातून पावसाला साद घालून मुंबई अखेर ओलेचिंब केली.
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने "पाऊसधारा" पाचवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अष्टपैलू साहित्यिका कल्पना दिलीप मापूसकर ह्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांचे वैभवी विनीत गावडे यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते. कविसंमेलनाची सुरूवात सरोज सुरेश गाजरे यांच्या मातापित्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये वैभवी विनीत गावडे, सुहास नारायण जोशी, सुनिता पांडुरंग अनभुले, प्रसाद यशवंत कोचरेकर, अनील खेडेकर, रामकृष्ण चिंतामण कामत, मीरा सावंत, गौरी यशवंत पंडित, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, अपर्णा अनिल पुराणिक, प्रणाली प्रकाश सावंत, डॉ. मानसी पाटील, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नंदा कोकाटे, आदित्य प्रदीप भडवळकर, अनु इंगळे, स्मिता शाम तोरसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे आणि सनी आडेकर
यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये वेदान्त पंडित याने त्याचं बक्षिसपात्र वक्तृत्व स्पर्धेतील भाषण, सुहास जोशी सुंदर असं नाट्यपद तर शितलादेवी कुळकर्णी यांनी एक विनोदी कविता सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडत्या कवींच्या पाऊस कविता सादर केल्या. त्यात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, बालकवी, ग्रेस, मंगेश पाडगांवकर, पुल देशपांडे, बा. भ. बोरकर, शंकर वैद्य, अशोक परांजपे, नलेश पाटील, संदीप खरे, बहिणाबाई, शांता शेळके यांच्या कवितांसोबत संजय कांबळे, गौरी पंडित, सरोज गाजरे आणि शेलेश निवाते यांच्या कवितांनी आभाळालाही भरून आलं आणि पाऊसधारा बरसू लागल्या.
संमेलनाध्यक्ष कल्पना मापूसकर यांनी मनोगतामध्ये मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी गुणी साहित्यिका गौरी यशवंत पंडित असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी वैभवी गावडे, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment