सारस्वतांनी कवितेतून साजरा केला "गणेशोत्सव"
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणपती बाप्पा घरोघरी आले, त्यांची विधीवत पूजाअर्चा झाली, लाडू मोदकांचा नेवैद्यही त्यांनी स्वीकारला, प्रत्येकाला भरभरून आशीर्वाद आणि आनंद देऊन बाप्पांचं विसर्जनही झालं. त्याच काळात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून सगळे चाकरमानी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रवाना झाले. तिथेही त्यांनी भजन कीर्तनातून बापाचा जागर केला. इतकं सगळं करूनही काहीतरी चुकल्यासारखं प्रत्येकालाच वाटत होतं. तिच काव्यरूपी जागर करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात साधली.
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक दिग्दर्शक अभिनेते शैलेश भागोजी निवाते हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे, उपाध्यक्ष विद्याधर शेडगे आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात सुंदर शिवगर्जनेसह अर्णव शेडगे ह्या बालकलाकाराने केली आणि संपूर्ण वातावरणात एक उर्जा चैतन्य पसरले. कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये सरोज सुरेश गाजरे, कल्पना दिलीप मापूसकर, स्वाती हेमंतकुमार शिवशरण, महेश अविनाश नाडकर्णी, जयश्री हेमचंद्र चुरी, सुनिता पांडुरंग अनभुले, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, सीमा विश्वास मळेकर, नंदन भालवणकर, वैभवी विनीत गावडे, राजेंद्र मधुकर सावंत, प्रणाली प्रकाश सावंत, संतोष धर्मराज मोहिते, विक्रांत मारुती लाळे, रविंद्र शंकर पाटील, प्रसाद यशवंत कोचरेकर यांनी श्रीगणेशाचा जागर करणार्या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली.
मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहारासोबत मोदकाचा आस्वाद घेत असतांना नंदन भालवणकर यांनी सुस्वर गीत सादर केले. सुनिता अनभुले यांनी निसर्गातील आणि रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करून "तो आणि ती" मधला भेद उलगडत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. तर बालगायक अर्णव शेडगे यांने "जय जय महाराष्ट्र माझा' ह्या गीताने वातावरण भारून टाकले. दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या आवडत्या स्वरचित मराठी रचना सुंदररीत्या सादर केल्या.
संमेलनाध्यक्ष शैलेश भागोजी निवाते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांनी प्रत्येक कवीची रचना शांतचित्ताने ऐकतांना त्या प्रत्येक कवितेवर एक सुंदर अशी चारोळीही लिहिली आहे. त्यापैकी काही चारोळ्या त्यांनी सभागृहात मांडल्या, उपस्थितांनी त्यांच्यातल्या ह्या शीघ्रकवीचे कौतुक टाळ्यांच्या गजरात केले. त्यानंतर मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment