६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई केंद्राचे शानदार उद्घाटन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सुप्रसिद्ध नेपथ्यकार तसेच रंगकर्मी सुनील देवळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, साहित्यिक, पत्रकार, सुसंवादक गुरुदत्त वाकदेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी तसेच परीक्षक प्राची गडकरी, राम चव्हाण, सतिश पेंडसे यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अभिनेते विनय कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने अविरत चालवेला रंगकर्मी घडविणारा हा यज्ञ यंदा ६३व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे रंगकर्मींच्या कलागुणांचा सन्मान होणारी स्पर्धा घेतली जाते. केवळ १० रूपयांमध्ये वातानुकूलित सभागृहात हसवणार्या रडवणार्या समाज प्रबोधन करणार्या नाटकांची पर्वणी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे येताना आपल्या सोबत किमान एका प्रेक्षकाला प्रत्येकाने घेऊन यावे आणि रंगकर्मींना दाद द्यावी, अशी कळकळीची विनंती गुरुदत्त वाकदेकर यांनी आपल्या मनोगतामधून केली. तसेच आयोजकांना आणि सर्व रंगकर्मीना स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या फ्रिज महादेव या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-१ केंद्रावर सुरू झाली असून ५ डिसेंबर पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध १८ नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच "रंगभूमी डॉट कॉम" ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक राकेश तळगावकर हे काम पाहत आहे.
No comments:
Post a Comment