Friday, 28 February 2025

मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

 


मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री जी. ओ. शाह ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "आपल्या भाषेची श्रीमंती आपणच वाढवली पाहिजे. त्यासाठी अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. अनेक पुस्तकांचा आढावा घेताना ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने कसे भारावून टाकले, हे विद्यार्थिनींनी आपल्या स्वानुभवातून मांडले."

कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी ‘म...मराठीचा’ हे पथनाट्य सादर केले.

साताऱ्यावरून विशेष उपस्थित असलेले डबिंग कलाकार गणेश चिंचकर यांनी विद्यार्थिनींना मराठीत करिअरच्या संधी समजावून सांगितल्या आणि आवाजाच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. उपप्राचार्य डॉ. अवनिश भट्ट यांनी सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

ग्रंथालयाच्या गायत्री हार्डीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा व मराठी भाषेच्या अभिजाततेचा आढावा घेत वाचनवृद्धीवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता सिंग यांनी विंदा करंदीकरांची ‘नजर रोखून नजरेमध्ये’ ही कविता सादर केली.

प्रा. किरण जाधव यांनी विदर्भी भाषेतील प्रहसन सादर केले, तर डॉ. हिरालाल भोसले यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनाने स्वतःमध्ये कसा बदल घडला, हे विद्यार्थिनींसमोर मांडले.

डॉ. माधवी साठये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचा आढावा घेत पर्यायी मराठी शब्दांविषयी माहिती दिली तसेच ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातील विचार मांडले.

मानसशास्त्र विभागाच्या वेदश्री भागवत यांनी अनेक पुस्तकांचा आढावा घेत आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. प्रा. शरद गिरमकर यांनी विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ आणि ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण केले.

प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ कादंबरीचा आढावा घेतला. काही विद्यार्थिनींनीही आपल्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे, प्रा. नेहा भोसले आणि प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अश्विनी प्रभू यांनी समारोपप्रसंगी आपली भूमिका मांडली तसेच ग्रंथालयाने मराठी कवितासंग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!

 


रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीने इनर व्हॉईस सोशल वेलफेअर फाऊंडेशन, आंतरराष्ट्रीय महावीर क्लब आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण १२० युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयएमए मुंबई शाखेचे सन्माननीय सचिव डॉ. प्रागजी वाजा आणि रक्तदान समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज बंदरकर उपस्थित होते. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. वाजा म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियमित रक्तदान करून या कार्यात सहभाग घ्यावा."

शिबिरात युवक-युवती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, पोलिस कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले, तर काही नियमित रक्तदात्यांनी या कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

नायर रुग्णालय रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, "अनेक रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण आणि थॅलेसिमियासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्तदान हा समाजासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे."

आयएमए मुंबई शाखेने अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. अनेकदा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. प्रागजी वाजा यांनी केले.

शिबिर संपल्यानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रक्तदान केल्यानंतर अनेक दात्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "आपल्या एका छोट्या कृतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचू शकतात, ही जाणीव खूप आनंद देणारी आहे."

समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याचा संकल्प करावा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. "रक्तदान करा, जीवनदान द्या!" हा संदेश देत, या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.


Monday, 3 February 2025

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड    

   

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी  झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा‌ शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या‌ जन्मदिनी गुणगौरव केला.

   

शाहीर साबळे, अमरशेख‌ आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी‌ शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८०‌ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

‌‌  

आमदार‌ डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.

   

कार्यक्रमाला‌ शाहिरी‌ लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल‌ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन‌‌ बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे‌ यांनी केले. सुधीर‌ प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे‌‌ आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात‌, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा

 

साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे

'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी  प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही." अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.


कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.


मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या. 


कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.


कार्यक्रमाची सांगता करताना "शोध आनंदाचा फाऊंडेशन" चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 


१२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. 


कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.