रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीने इनर व्हॉईस सोशल वेलफेअर फाऊंडेशन, आंतरराष्ट्रीय महावीर क्लब आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण १२० युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयएमए मुंबई शाखेचे सन्माननीय सचिव डॉ. प्रागजी वाजा आणि रक्तदान समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज बंदरकर उपस्थित होते. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. वाजा म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियमित रक्तदान करून या कार्यात सहभाग घ्यावा."
शिबिरात युवक-युवती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, पोलिस कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले, तर काही नियमित रक्तदात्यांनी या कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
नायर रुग्णालय रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, "अनेक रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण आणि थॅलेसिमियासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्तदान हा समाजासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे."
आयएमए मुंबई शाखेने अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. अनेकदा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. प्रागजी वाजा यांनी केले.
शिबिर संपल्यानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रक्तदान केल्यानंतर अनेक दात्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "आपल्या एका छोट्या कृतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचू शकतात, ही जाणीव खूप आनंद देणारी आहे."
समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याचा संकल्प करावा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. "रक्तदान करा, जीवनदान द्या!" हा संदेश देत, या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
No comments:
Post a Comment