Tuesday, 12 September 2023

श्रीलंकेला ४१ धावांनी हरवत भारताने गाठली अंतिम फेरी



 श्रीलंकेला ४१ धावांनी हरवत भारताने गाठली अंतिम फेरी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कपच्या सुपर-४ सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम खेळताना भारतीय संघ २१३ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा संघही १७२ धावांवर बाद झाला.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. यानंतर गिल १९ धावा करून बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. रोहित शर्माने तुफानी शैलीत खेळत ४८ चेंडूत ५३ धावा केल्या आणि १० हजार एकदिवसीय धावाही पूर्ण केल्या. कोहली ३ धावा करून बाद झाला. इशान किशनने ३३ आणि केएल राहुलने ३९ धावा केल्या.  खालच्या फळीकडून अक्षर पटेलने २६ धावा केल्या आणि टीम इंडिया २१३ धावांवर बाद झाली. श्रीलंकेसाठी वेलालगेने ४० धावांत एकूण ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय चरित असलंकानेही ४ बळी घेतले. महिष तिक्ष्णालाही एक विकेट मिळाली.


प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेची अवस्थाही बिकट होती. सलामीवीर निसांका ६ धावा करून आणि करुणारत्ने २ धावा करून बाद झाला.  त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिसही १५ धावांवर बाद झाला. यानंतर समरविक्रम १७ धावा आणि अस्लंका २२ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. शनाकाला बाद करून रवींद्र जडेजाने श्रीलंकेला सहावा धक्का दिला. धनंजय डी सिल्वाने एक बाजू लावून धरली. त्याने वेलालगेसह अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या. जडेजाने डी सिल्वाला बाद करून ही भागीदारी भेदली. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ बळी मिळाल्याने श्रीलंकेची धावसंख्या ९ गडी बाद १७२ अशी झाली. या धावसंख्येवर कुलदीपने आणखी एक विकेट घेत श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. कुलदीपने ४ बळी घेतले. बुमराहला २ बळी मिळाले.


श्रीलंकेसाठी ४० धावांत ५ बळी घेणार्‍या दुनिथ वेलालगेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.


भारताचा सुपर-४ चा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.


No comments:

Post a Comment