Sunday, 1 October 2023

भारताने पाकिस्तानवर विजयाची केली हॅट्ट्रिक केली; एका दिवसात तीन वेगवेगळ्या खेळांमध्ये केला त्यांचा पराभव; त्यापैकी दोन अंतिम सामने

 




भारताने पाकिस्तानवर विजयाची केली हॅट्ट्रिक केली; एका दिवसात तीन वेगवेगळ्या खेळांमध्ये केला त्यांचा पराभव; त्यापैकी दोन अंतिम सामने

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताने शनिवारी तीन वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. यातील दोन सामने हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील होते, तर एक सामना अंडर-१९ सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉलचा होता. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आणि एका दिवसात कट्टर प्रतिस्पर्ध्यावर विजयाची हॅट्ट्रिक केली.  यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील एक सामना सुवर्णपदकासाठी होता, जो पाकिस्तानने गमावला.

हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉशच्या पुरुष सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने प्रथम पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या गट टप्प्यात भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव करत सर्वात मोठा विजय संपादन केला. अंडर-१९ सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

हॉकी:-

पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या चार गोलमुळे भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला.

भारतीय संघ चार सामने जिंकून अ गटात अव्वल स्थानावर आहे. त्यांचा पुढील सामना बांगलादेश विरुद्ध  २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  भारतासाठी इतर गोल वरुण कुमार (२), मनदीप सिंग (१), सुमित (१), शमशेर सिंग (१), ललित उपाध्याय (१) यांनी केले.  पाकिस्तानकडून मोहम्मद खान (१), अब्दुल राणा (१) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा १८० वा सामना होता, परंतु आजपर्यंत या दोन देशांमधील एकाही सामन्यात आठ गोलचा फरक पडलेला नाही. यापूर्वी दोन्ही संघांनी एकमेकांचा ७-१ अशा फरकाने पराभव केला होता.

स्क्वॉश:-

आत्तापर्यंत भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार क्रिकेट आणि हॉकीमध्ये पाहायला मिळाला होता, मात्र हाच श्वास रोखून धरणारा थरार शनिवारी स्क्वॉशमध्ये पाहायला मिळाला. दोन मॅच बॉल्स (मॅच पॉइंट्स) वाचवत अभय सिंगने पाकिस्तानच्या नूर जमानचा पाच गेममध्ये पराभव करून भारताला २-१ असा विजय मिळवून दिला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. एवढेच नाही तर तीन दिवसांपूर्वी साखळी फेरीत पाकिस्तानकडून अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला भारताने घेतला. यासह भारतीय संघाने नऊ वर्षांनंतर या खेळात आशियाई क्रीडा स्पर्धेत वर्चस्व मिळवले.

२०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्या संघात सौरव घोषाल, महेश माणगावकर आणि हरिंदर पाल सिंग संधू यांचा समावेश होता. हे तीन खेळाडू शनिवारी सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातही होते. विजयाचा शिल्पकार अभय सिंग या संघाचा नवा सदस्य आहे. अभयने ११-७, -११, ८-११, ११-९, १२-१० असा विजय मिळवला. २५ वर्षीय अभय चौथ्या गेममध्ये ७-९ आणि पाचव्या गेममध्ये ८-१० असा पिछाडीवर होता. पाकिस्तानला विजयासाठी फक्त एका गुणाची गरज होती, पण अभयने ते होऊ दिले नाही. हा सामना ६४ मिनिटे चालला.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या इक्बाल नासिरने महेशचा ११-८, ११-२, ११-३ असा पराभव केला पण सौरव घोषालने आपली सहावी एशियाड स्पर्धा खेळत असताना मुहम्मद असीम खानचा ११-५, ११-३, ११-१ असा पराभव केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर अभयने नूरचा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

सैफ अंडर-१९ फुटबॉल चॅम्पियनशिप :-

नेपाळमधील दशरथ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सैफ अंडर-१९ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील फुटबॉल संघाने पाकिस्तानचा ३-० असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. स्क्वॉशच्या अंतिम फेरीनंतर येथेही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या किपगेन आणि गोयारी यांनी गोल केले. भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाने यंदा सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले.


No comments:

Post a Comment