हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर ६६ वर्षातील सर्वात मोठा विजय; गेल्या २५ सामन्यांमध्ये १७व्यांदा पाकचा केला पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा १०-२ असा धुव्वा उडवला. भारत-पाकिस्तान हॉकी सामन्यात कोणत्याही संघाने १० गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने हा विक्रम केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९५६ मध्ये पहिला हॉकी सामना झाला होता. भारत-पाकिस्तान हॉकीच्या ६६ वर्षांच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७-१ असा विजय मिळवला होता. हा सामना २०१७ वर्ल्ड लीगमध्ये खेळला गेला. भारत-पाकिस्तान हॉकी सामन्यातील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताविरुद्ध ७-१ असा सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रमही पाकिस्तानच्या नावावर आहे. असे त्यांनी दोनदा केले आहे. १९८० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात आणि दिल्लीत १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा ७-१ फरकाने पराभव केला होता.
२०१३ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात २५ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने या कालावधीत १७ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही देशांदरम्यान एकूण १८० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ६६ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३२ सामने अनिर्णित राहिले. या एशियाड सामन्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना यावर्षी ऑगस्टमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूल सामन्यादरम्यान झाला होता. भारतीय संघाने हा सामना ४-० असा जिंकला होता.
एशियाडमध्ये भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली सलग चारही पूल फेरीचे सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने त्यांच्या पूल-ए सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. यानंतर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सिंगापूरचा १६-१ असा पराभव करत सलग दुसरा विजय संपादन केला. त्यानंतर टीम इंडियाने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या जपानचा ४-२ असा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. आता भारताने पाकिस्तानला हरवून विजय चौकार लगावला आहे. त्याचवेळी, पाकिस्तान संघाने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पूल लीगमध्ये तिन्ही सामने जिंकले होते. अ गटातील त्यांच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानने सिंगापूरचा ११-०, बांगलादेशचा ५-२ आणि उझबेकिस्तानचा १८-२ असा पराभव केला होता. भारताविरुद्ध १०-२ असा पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तानवर विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. आता अंतिम पूल-अ सामन्यात भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने (११वे, १७वे, ३३वे आणि ३४वे मिनिट) चार गोल केले, तर वरुणने (४१वे आणि ५४वे मिनिट) दोन गोल केले. ललित (४९वे मिनिट), समशेर (४६वे मिनिट), मनदीप (८वे मिनिट) आणि सुमित (३०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानकडून सुफियान मोहम्मद (३८वे मिनिट) आणि अब्दुल राणा (४५वे मिनिट) यांनी दोन गोल केले.
पहिल्या क्वार्टरमध्ये आठव्या मिनिटालाच भारताने पहिला गोल केला. मनदीप सिंगने मैदानी गोल करत टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ११व्या मिनिटाला पाकिस्तानी गोलकीपरच्या फाऊलमुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारतीय संघाला २-० ने आघाडीवर नेले. भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या क्वार्टरच्या १७व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला आणि टीम इंडियाची आघाडी ३-० अशी वाढवली. यानंतर ३०व्या मिनिटाला म्हणजेच दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी सुमित, ललित आणि गुरजंत यांच्या जोडीने भारतासाठी चौथा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने पाकिस्तानवर ४-० अशी आघाडी घेतली होती.
तिसऱ्या क्वार्टरच्या ३३व्या मिनिटाला पाकिस्तानने केलेल्या फाऊलवर भारताला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर कर्णधार हरमनप्रीतने गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. यानंतर ३४व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह चौकार लगावला. ३८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान मोहम्मदने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला. या सामन्यातील पाकिस्तानचा हा पहिला गोल ठरला. यानंतर ४१व्या मिनिटाला सुखजीतच्या पासवर भारताच्या वरुण कुमारने शानदार गोल करत भारताची आघाडी ७-१ अशी वाढवली. यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी पाकिस्तानच्या अब्दुलने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पाकिस्तानला सामन्यात परत आणले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर ७-२ अशी आघाडी घेतली होती.
चौथ्या क्वार्टरच्या ४६व्या मिनिटाला भारताच्या समशेरने अप्रतिम मैदानी गोल केला. या सामन्यातील भारताचा हा आठवा गोल ठरला. यानंतर ४९व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगकडून ललित उपाध्यायने गोल करून भारताची आघाडी ९-२ अशी वाढवली. ५३ व्या मिनिटाला वरुणने सामन्यातील आपला दुसरा आणि भारताचा १०वा गोल केला. अशा प्रकारे टीम इंडियाने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला.
No comments:
Post a Comment