Saturday, 7 October 2023

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने एशियाडमध्ये पहिले सुवर्ण जिंकले; अफगाणिस्तानला सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक

 



भारतीय पुरुष क्रिकेट संघाने एशियाडमध्ये पहिले सुवर्ण जिंकले; अफगाणिस्तानला सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  शनिवारी (७ ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्धचा अंतिम सामना पावसामुळे वाहून गेला.  आयसीसी क्रमवारीच्या आधारे टीम इंडियाला चॅम्पियन घोषित करण्यात आले. टी२० क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. भारतीय पुरुष संघाने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानला सलग तिसरे रौप्यपदक मिळाले आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करून कांस्यपदकावर कब्जा केला.

मानांकनाच्या आधारे भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. नेपाळचा २३ धावांनी पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध नऊ गडी राखून विजय मिळवला. दुसरीकडे, अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत त्यांना तशी संधी मिळाली नाही.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियाडमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते तर २०१४ मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून त्यांना तिसऱ्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या.  त्यानंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही.

अफगाणिस्तानच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर शाहिदुल्ला कमालने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. कर्णधार गुलबदिन नायब २७ धावा करून नाबाद राहिला. अफसर जझाईने १५ धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. जुबैद अकबरी पाच धावा करून बाद झाला तर मोहम्मद शहजाद चार धावा करून बाद झाला.  नूर अली झद्रान आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक धाव काढली. भारताकडून अर्शदीप सिंग, शिवम दुबे, शाहबाज नदीम आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


No comments:

Post a Comment