Friday 26 January 2024

पहिल्या डावात भारताची १७५ धावांची आघाडी; भारताची धावसंख्या ४२१/७

 


पहिल्या डावात भारताची १७५ धावांची आघाडी; भारताची धावसंख्या ४२१/७


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज दुसरा दिवस पार पडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने पहिल्या डावात २४६ धावा केल्या. भारताने गुरुवारी पहिला डाव एका विकेटवर ११९ धावांवरून सुरू केला आणि दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत सात गड्यांच्या मोबदल्यात ४२१ धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांची शतके हुकली.  त्याचवेळी रवींद्र जडेजा शतकाच्या जवळ आहे. सध्या टीम इंडियाकडे इंग्लंडवर १७५ धावांची आघाडी आहे.  रवींद्र जडेजा ८१ धावांवर नाबाद असून अक्षर पटेल ३५ धावांवर नाबाद आहे.


दुसऱ्या दिवशी भारताने ११९/१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत ३०२ धावा जोडल्या आहेत. भारताला शुक्रवारी पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. दिवसाच्या पहिल्याच षटकात जो रूटने त्याला तंबूमध्ये पाठवले. त्याच्याच चेंडूवर रूटने त्याचा झेल घेतला. यशस्वीचे शतक हुकले आणि तो ८० धावा करून बाद झाला. त्याचवेळी आजचा दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. त्याला टॉम हार्टलीने बेन डकेटच्या हाती झेलबाद केले. त्याला २३ धावा करता आल्या. यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. फटकेबाजीच्या नादात श्रेयसची विकेट गेली. श्रेयस अय्यर ३५ धावा करून बाद झाला.  


राहुलने कसोटी कारकिर्दीतील १४वे अर्धशतक झळकावले. तो शतक झळकावेल असे वाटत होते, पण वैयक्तिक ८६ धावांवर तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी राहुलने रवींद्र जडेजासोबत ६५ धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजा आणि केएस भरत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २०वे अर्धशतक झळकावले. या सामन्यात जो रूटने दुसरे यश मिळवले. त्याने केएस भरतला पायचीत टिपले. भरतला ४१ धावा करता आल्या. भारताला ३५८ धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विन एक धाव काढून धावबाद झाला. अश्विन आणि जडेजा एका वेळी एकाच टोकाला होते. मात्र, जडेजा आधी क्रीजमध्ये आला त्यामुळे अश्विन धावबाद झाला. यानंतर जडेजाने अक्षरसोबत आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली.


जडेजाने १५५ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या असून अक्षरने ६२ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या आहेत.  इंग्लंडकडून हार्टले आणि रूटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.  जॅक लीच आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. उद्या भारत किती धावांची आघाडी घेणार त्यावर ह्या सामन्याचा निकाल ठरेल.


No comments:

Post a Comment