Tuesday, 4 June 2024

श्रीलंका ७७ धावांवर तंबूमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून शानदार विजय

 


श्रीलंका ७७ धावांवर तंबूमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून शानदार विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ च्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद ७७ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १६.२ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने (१९) सर्वाधिक धावा केल्या. तर अँजेलो मॅथ्यूज १६ धावा करू शकला.  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १६.२ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.  


श्रीलंकेची ही टी२० आंतरराष्ट्रीय आणि टी२० विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, श्रीलंकेची टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या ८२ धावा होती, जी त्यांनी २०१६ मध्ये विशाखापट्टणम येथे भारताविरुद्ध केली होती. तसेच यापूर्वी श्रीलंकेची टी२० विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या ८७ होती. २०१० मध्ये ब्रिजटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा संघ १६.२ षटकांत ८७ धावांत सर्वबाद झाला होता. मात्र, ही धावसंख्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात केली. त्याच वेळी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सर्वात कमी धावसंख्या १०१ धावा आहे, जी त्यांनी २००७ मध्ये केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. ७७ धावा ही टी२० विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीलंकेचे आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. यातील चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पाथुम निसांका तीन धावा करून बाद झाला. यानंतर संपूर्ण फलंदाजीची फळी कोलमडली.  एनरिक नॉर्त्जेने कहर केला आणि कुसल मेंडिस (१९), कामिंदु मेंडिस (११), चरिथ असलंका (६) आणि एंजलो मैथ्यूज (१६) यांना तंबूमध्ये पाठवले. नॉर्त्जेने चार षटकांत सात धावा दिल्या आणि चार बळी घेतले. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. महाराजने एकाच षटकात दोन्ही विकेट घेतल्या. त्याने कर्णधार वानिंदु हसरंगा (०) आणि सदीरा समरविक्रमा (०) यांना बाद केले. दासुन शनाका (९) आणि मथीशा पथिराना (०) यांना रबाडाने तंबूमध्ये पाठवले. तर नुवान तुषारा (०) धावबाद झाला. ओटनील बार्टमैनला एक विकेट मिळाली.


नॉर्त्जेचा हा स्पेल टी२० विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाचा सर्वोत्तम स्पेल आहे. त्याने स्वतःचाच दोन वर्षे जुना विक्रम मोडला. २०२२ च्या टी२० विश्वचषकात त्याने बांगलादेशविरुद्ध सिडनीमध्ये १० धावांत चार विकेट घेतल्या होत्या. नॉर्त्जेने टी२० विश्वचषकात आतापर्यंत ११ सामन्यांत २४ बळी घेतले आहेत. टी२० विश्वचषकातील पहिल्या ११ सामन्यांनंतर गोलंदाजाने घेतलेल्या ह्या सर्वाधिक विकेट आहेत. त्याने त्याच्या ११ विश्वचषकाच्या सामन्यात किमान एक विकेट घेतली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत नॉर्त्जेने आतापर्यंत तीन वेळा एका डावात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. शाकिब अल हसन आणि सईद अजमल यांच्यासोबत संयुक्तपणे हा सर्वोच्च क्रमांक आहे.


७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. रीजा हेंड्रिक्स चार धावा करून तंबूमध्ये परतला. क्विंटन डिकॉक २० धावा करून बाद झाला तर कर्णधार एडेन मार्करम १२ धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सला १३ धावा करता आल्या. यानंतर डेविड मिलरसह हेनरिक क्लासेनने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयापर्यंत नेले. क्लासेन २२ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला तर मिलर सहा धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून कर्णधार वानिंदु हसरंगाने दोन बळी घेतले. तर नुवान तुषारा आणि दासुन शनाका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


एनरिक नॉर्त्जेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा तर रात्री ८ वाजता इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना होणार आहे.

No comments:

Post a Comment