Sunday, 9 June 2024

टी२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर सातवा विजय, रोमांचक सामन्यात सहा धावांनी विजयी, बुमराह ठरला सामनावीर

 


टी२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर सातवा विजय, रोमांचक सामन्यात सहा धावांनी विजयी, बुमराह ठरला सामनावीर


सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर सातवा विजय नोंदवला. अवघ्या ११९ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य गाठू दिले नाही आणि सहा धावांनी विजय मिळवला. सामनावीर जसप्रीत बुमराहने चार षटकात अवघ्या १४ धावांत तीन बळी घेत भारतीय विजयाचा हिरो ठरला. सामन्यात पाकिस्तानला ३० चेंडूत ३७ धावांची गरज होती आणि सहा विकेट्स शिल्लक होत्या, परंतु भारतीय गोलंदाजांनी ३० धावा दिल्या आणि पाकिस्तानला सात विकेट्सवर एकूण ११३ धावांपर्यंतच मर्यादित केले. टी२०  विश्वचषकातील आठ सामन्यांमधला भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. एकदिवसीय तसेच टी२० विश्वचषकासह १६ सामन्यांमधला भारताचा पाकिस्तानवरचा हा १५वा विजय आहे. तसेच २०२४ च्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे.


१२० धावांचा पाठलाग करताना, शिवम दुबेने बुमराहच्या चेंडूवर रिझवानचा अतिशय सोपा झेल सोडला तेव्हा रिझवान सात धावांवर खेळत होता. पाकिस्तानच्या खात्यावर १७ धावा लागल्या होत्या. मात्र, पाचव्या षटकात बाबरला (१३) बाद करून बुमराहला पहिले यश मिळाले. पाकिस्तानने ८.५ षटकात ५० धावा पूर्ण केल्या. त्यानी १० षटकात १ गडी बाद ५७ धावा केल्या. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षरने उस्मान खानला (१३) पायचीत टिपले, पण त्याच षटकात फखर जमानने अक्षरवर षटकार ठोकला. हार्दिकने १३व्या षटकात झमानला (१३) बाद करून आशा उंचावल्या.


पाकिस्तानच्या आशा रिझवानवर टिकल्या होत्या, पण बुमराहने ४४ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या रिझवानला त्रिफळाचीत बाद केले आणि धावसंख्या चार विकेट्सवर ८० झाली. पाकिस्तानला शेवटच्या पाच षटकात विजयासाठी ३७ धावा करायच्या होत्या. १७व्या षटकात हार्दिकने शादाबला बाद करत पाचवा गडी बाद केला. पाकिस्तानला १८ चेंडूत ३० धावा हव्या होत्या. इमाद आणि इफ्तिखारने सिराजच्या षटकात नऊ धावा केल्या आणि १२ चेंडूत २१ धावांचे लक्ष्य होते, पण बुमराहने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इफ्तिखारला (५) बाद केले नाही तर केवळ तीन धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात १८ धावांचे लक्ष्य ठेवले.


अखेरच्या षटकात अर्शदीप सिंग भारतासाठी गोलंदाजी करायला आला. तर इमाद वसीम आणि नसीम शाह खेळपट्टीवर होते. पहिल्या चेंडू यष्टीरक्षक पंतकडे गेला. पंतने झेल पकडल्याची दाद मागितली परंतु पंचांनी नाबाद सांगितल्यावर कर्णधाराने रिव्ह्यू घेतला. चेंडू इमादच्या बॅटला लागला होता. अशा स्थितीत इमाद पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर नसीम शाहने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपचा चेंडू शाहीनच्या पायाला लागला. त्याने एक धाव घेतली. नसीम शाहने चौथ्या चेंडूवर चार धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर नसीमने पुन्हा चौकार लगावला. अशा स्थितीत पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर आठ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर नसीमने एक धाव घेतली आणि भारतीय संघ सहा धावांनी विजयी झाला.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांच्या वेगापुढे भारताच्या कागदावर तगड्या दिसणार्‍या फलंदाजांच्या बॅटची धार बोथट झाली. भारतीय फलंदाज पूर्ण २० षटकेही खेळू शकले नाहीत आणि केवळ ११९ धावांवर बाद झाले. पाकिस्तानविरुद्ध टी२० मधील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. खेळपट्टीची भीती म्हणा किंवा समर्पणाचा अभाव म्हणा, भारतीय फलंदाज त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत खूपच मागे दिसले. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद आमिर यांनी शानदार गोलंदाजी केली. ११.१ षटकांत ८९ धावांत तीन गडी बाद झाल्यानंतर भारताने ३० धावांत सात विकेट गमावल्या आणि संघ १९ षटकांत ११९ धावांत गडगडला. भारताला अडचणीत आणणाऱ्या नसीम शाहच्या गोलंदाजीत धार होती. त्याने २१ धावांत तीन बळी घेतले. पंतने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या.


सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने सामना विस्कळीत केला. नाणेफेकीलाही अर्धा तास उशीर झाला. बाबर आझमने नाणेफेक जिंकली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता खेळ सुरू होऊ शकला नाही. यानंतर सामना ८:५० वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


रोहित शर्माने (१३) पहिल्याच षटकात शाहीनच्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर षटकार मारला तेव्हा काहीतरी खास घडणार आहे, असे वाटत होते. पहिले षटक संपताच पुन्हा पाऊस पडला. २० ते २५ मिनिटांनी खेळ सुरू झाला तेव्हा विराटने (४) नसीमच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून पाकिस्तानला पुन्हा लक्ष्य करणार असल्याचे दाखवून दिले, पण त्याच षटकात तो बाद झाला. याआधी त्याने टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७८*, ३६*, ५५*, ५७ आणि ८२* धावांची खेळी खेळली आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या षटकात शाहीनवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना तिसऱ्या षटकात रोहित (१३) बाद झाला. भारताने केवळ १९ धावांतच सलामीची जोडी गमावली.


झटपट विकेट पडल्यामुळे अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला साथ देण्यासाठी पाठवण्यात आले. त्याने पाचव्या षटकात शाहीनवर एक चौकार आणि एक षटकारही लगावला. सहाव्या षटकात पंतने आमिरला दोन चौकार मारले आणि पॉवरप्लेमध्ये भारताला ५० धावांपर्यंत नेले. पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या दोन बाद ५० अशी होती. पंतने पहिल्या १४ चेंडूंमध्ये पाकिस्तानला चार कठीण संधीही दिल्या. आठव्या षटकात स्थिरावलेल्या अक्षरला नसीमने त्रिफळाचीत बाद केले. त्याने १८ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या. दोघांनी ३० चेंडूत ३९ धावा जोडल्या. पंतने १०व्या षटकात रौफवर लागोपाठ तीन चौकार मारून १९ षटकात ३ बाद ८१ अशी मजल मारली.


भारताची धावसंख्या ११.१ षटकात तीन विकेट गमावत ८९ धावा होती. येथे रौफने सूर्यकुमारला (७) बाद केले. इथून विकेट्सची झुंबड उडाली. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नवीन चेंडूपेक्षा जुन्या चेंडूने जास्त धोकादायक दिसत होते. नसीमने शिवम दुबे (३) बाद केले आणि आमिरने ३१ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४२ धावा करणाऱ्या पंत आणि जडेजा (०) यांना सलग दोन चेंडूंत बाद करत भारताची धावसंख्या सात गडी बाद ९६ धावा केली. सात धावांत भारताने ४ विकेट गमावल्या. भारताने १६ षटकांत १०० धावा केल्या. रौफने सलग दोन चेंडूंवर हार्दिक (७) आणि बुमराह (०) यांना बाद केले.

सामना सुरू होण्याआधी भारतीय संघातील काही सदस्य फुटबॉल खेळत असताना युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक क्रिकेटर ख्रिस गेल मैदानात पोहोचला. गेल वेगळ्या पोशाखात होता. त्याच्या शर्टच्या एका बाहीवर भारतीय तिरंगा होता आणि दुसरा पाकिस्तानी ध्वजाचे प्रतीक असलेला हिरवा होता. यावर त्याने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले होते. या जॅकेटवर गेलने सर्वप्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्माची स्वाक्षरी घेतली. यानंतर त्याने फुटबॉल खेळणाऱ्या भारतीय सदस्यांजवळ जाऊन फुटबॉलवर हात आजमावला आणि विराट कोहलीला स्वाक्षरी देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांने संपूर्ण भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी घेतली. केवळ गेलच नाही तर या विश्वचषकासाठी आयसीसीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त झालेला सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगही मैदानावर दिसले. सचिनला पाहताच स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सचिन-सचिन असा जयघोष सुरू केला. सचिननेही त्यांना हात हलवून अभिवादन केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी सचिन पत्नी आणि मुलगी सारासोबत न्यूयॉर्कला पोहोचला आहे.



No comments:

Post a Comment