पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली
कलाकारांसोबत रंगली सुरेल संगीत मैफल!
पुणे शहरातील महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशन अंतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या अनोख्या रॅलीत ‘गुलाबी’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रुती मराठेने सहभाग घेतला होता. महिलांनी गुलाबी रंगाच्या पारंपरिक पेहरावात सजून आपल्या दुचाकींसह रॅलीत सहभाग घेतला आणि चित्रपटाच्या गुलाबी थीमला उजाळा दिला.
रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथून झाली, ज्यात महिलांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रॅलीचा मार्ग करिष्मा चौक, सीडीएसएस चौक, आणि डीपी रोड मार्गे शुभारंभ लॉन्स येथे समाप्त झाला. गुलाबी फेटे घातलेल्या महिलांनी आणि दुचाकींवरून निघालेल्या या रॅलीने पुण्याच्या रस्त्यांवर एक वेगळीच रंगत आणली होती.
रॅलीनंतर मंदार बलकवडे आयोजित ‘गुलाबी Live’ कार्यक्रमात चित्रपटातील संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात संगीत मैफलीचे सादरीकरण करण्यात आले. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवादाने कार्यक्रमाला एक वेगळा रंग दिला. श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी यांच्यासह कार्यक्रमात आदिती द्रविड, अभ्यंग कुवळेकर आणि सावनी राजेंद्र, हंसिका अय्यर, संगीतकार साई - पियुष यांनीही सहभाग घेतला. यावेळी चित्रपटातील गाण्यांसह इतर गाण्यांची मेजवानी होती
‘गुलाबी’ हा चित्रपट जयपूरच्या पार्श्वभूमीवर तीन मैत्रिणींच्या आयुष्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा प्रवास मांडतो. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “हा चित्रपट फक्त मैत्रीवर आधारित नसून, तर स्त्रियांच्या वैयक्तिक संघर्षांवर, त्यांच्या स्वप्नांवर आणि आत्मसन्मानाच्या शोधावर आधारित आहे. आम्ही या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे.”
चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट सादर केला आहे. या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार आणि निखिल आर्या यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साई-पियुष यांनी संगीत दिलेले आहे.
‘गुलाबी’ चित्रपट हा २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या रॅली व ‘गुलाबी Live’ कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता वाढली आहे.
No comments:
Post a Comment