Monday, 11 November 2024

‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा उमा आणि तुळजाची गोड मैत्री “पूजाला बिल्वामुळे गोड छोट्या मैत्रीचं सुख मिळालं” – पूजा काळे



 ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा उमा आणि तुळजाची गोड मैत्री

“पूजाला बिल्वामुळे गोड छोट्या मैत्रीचं सुख मिळालं” – पूजा काळे


महाराष्ट्राच्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका दिवसेंदिवस अधिकच मन:स्पर्शी आणि देवीच्या आईपणाची प्रचिती देणाऱ्या प्रसंगांनी लक्षणीय ठरली आहे, 

प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणारी ही मालिका, विशेषत: देवी तुळजाभवानी आणि उमा यांच्या अनोख्या नात्याच्या प्रवासामुळे विशेष गाजत आहे. उमाचे रुसवे-फुगवे संपवून आता आई तुळजाभवानीने आपल्या प्रेमाच्या शक्तीने उमाचा राग वितळवला आहे. ज्यामुळे उमा आणि तुळजामधले नाते अधिकच घट्ट झाले आहे. तुळजाभवानी आणि उमाच्या नात्यातील नाजूक क्षण पाहून प्रेक्षकांच्या मनात या दोघींवर असलेले प्रेम अधिकच वाढू लागले आहे. प्रत्येक भागात उमा आणि तुळजा मधील भावुक प्रसंग आणि गोड संवाद ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत बघायला प्रेक्षकांना आवडते आहे. उमा आणि तुळजा म्हणजेच बिल्वा आणि पूजामध्ये ऑफ स्क्रीन देखील मालिके पलीकडे खूप सुंदर नाते निर्माण झाले आहे.


पूजा बिल्वाबद्दल सांगताना म्हणाली, "खरंतर आई तुळजाभवानी मधलं हे माझं पहिलच अभिनयाचं काम आहे. सगळच नवीन आहे. खूप काही गंमती घडतायत,सगळ्याचा आनंद घेत मजा करतोय आम्ही सगळेच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकायला मिळतंय. आता ही उमा… उमा म्हणजे एनर्जीचा स्रोत आहे. आपण म्हणतो ना एखादं लहान मुल आपल्या घरी असावं तसं एक लहान मुल सेट वर असाव… सतत नाचत बसणार, उड्या मारणार. सतत कोणा न कोणाची कळ काढणारचं. मला कधी कधी वाटतं की स्वर्गात जर नारदमुनी नसते तर काय झाल असतं तर जगायला गंमतच आली नसती. तर सेटवर उमा म्हणजे तो कळीचा नारद आहे. 

एक प्रसंग मला आठवतो,  काय होतं की जेवताना बिल्वा नेहमी माझ्या बाजूलाच बसते. पण एकेदिवशी मी तिच्या बाजूला बसले नव्हते आणि ती चिडली. मालिकेतला प्रसंग पण असाच लिहून आला ही उमा देवी वरती चिडते. बरं ह्या बाईसाहेब माझ्यावरती चिडल्या आहेत हे मला माहिती नाही. तिने जो काय राग त्या सीन वरती काढला. त्या सीनच्या शेवटी ती मला मिठी मारते आणि म्हणते की तू कधीच सोडून नको जाऊस.  तिने मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी होतं...माझ्याही डोळ्यात पाणी आलं. इतकी गोड आहे ही,तिने असं काहीतरी केल्यानंतर कसं या मुलीवर रागवायचं सांगा. असं वाटतं तू बोलतच राहा मी ऐकतच राहते. खूप खूप खूप प्रेम वाटत. एक नात निर्माण  झालंय. खरंतर मी म्हणेन उमा मुळे देवीला मातृत्वाचे सुख मिळालं. आणि पूजाला बिल्वामुळे गोड छोट्या मैत्रीचं सुख मिळालं".


तर बिल्वा म्हणाली, "पूजा ताईने सांगितलं ना तसंच सेम मला पण वाटतं. मला वाटतं रोज शूटिंग असावं. रोज पूजाताई बरोबर सिन असावा. आणि मी काही कळ वगैरे काढत नाही. म्हणजे सीन लागलेला नसताना पण सिन लागलाय असं जाऊन पूजा ताईला सांगणं याला कळ वगैरे म्हणत नाही. याला आपली छोटीशी मजा म्हणतात. म्हणजे एकदा असंच झालं. एकदा मला खूप भूक लागली. तर मी एकटीने खाऊन घेतलं. जेवणाच्या ब्रेकला मी मेकअप रूम मध्ये बसले होते. पूजाताईने मला खूप शोधलं मी सापडलेच नाही. मग ती जेवलीच नाही. मला कळलं त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. पूजाताई माझ्याबद्दल सरांना तक्रार सांगते. पण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ पण तिच्यावर. त्यादिवशी मी रडले. मग आता आमच्या दोघांचं पण सेम सेम रडून झालय. म्हणून आमच्यात अशी घट्ट मैत्री निर्माण झाली आहे. जी मला खूप आवडते. ती मला समजून घेते. कधी कधी ओरडते. पण कधीकधी चॉकलेट पण आणून देते. आता मी ठरवलंय. जर मला सीन करताना मजा आली तर ती मला चॉकलेट देणार आणि जर मजा नाही आली तर दिग्दर्शक सर  तिला चॉकलेट देणार. मला आता जरा असं वाटायला लागलय. की आम्ही आता एकमेकींना चॉकलेटच  चॉकलेट देणार आहोत.


No comments:

Post a Comment